जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 14 ऑक्टोबर
मुलांनो, जे पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या देशात स्थलांतरित होतात त्यांना स्थलांतरित पक्षी म्हणतात. जेव्हा त्यांच्या गरजा पूर्ण होतात आणि हवामान बदलते तेव्हा हे पक्षी त्यांच्या मूळ ठिकाणी परततात. येथे आम्ही तुम्हाला काही स्थलांतरित पक्ष्यांबद्दल सांगत आहोत.
बार हेडेड गूज
बार हेडेड हंस किंवा पांढरा हंस भारतातून निघतो आणि मंगोलिया, तिबेट पठार आणि उत्तर चीन यांसारख्या योग्य भागात प्रजननासाठी प्रवास करतो. त्यासाठी हिमालयाच्या उंचच्या उंच आणि लांबच्या लांब पर्वतरांगा पार कराव्या लागतात. या पक्ष्याची जगातील सर्वात उंच ठिकाणी उडणारा पक्षी म्हणून मान्यता आहे. या पक्ष्याची 23,000 फूट उंचीवर सतत उड्डाण करण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे अशा उंचीवर ऑक्सिजनची पातळी खूपच कमी असते.
बार टेलेड गोडविट
बार टेलेड गॉडविट हा पक्षी स्थलांतरादरम्यान सर्वात लांब नॉन-स्टॉप उड्डाण करणारा पक्षी मानला जातो. हा मस्तमौला, उत्साही आणि चपळ असा पक्षी असून अलास्का ते न्यूझीलंडपर्यंत 11,000 किमीचे अंतर कुठेही आराम न करता, अन्न-पाणी न घेता आणि कुठेही न थांबता आठ दिवसात पूर्ण करतो. ध्येय गाठल्याशिवाय चैन नाही, हा या पक्ष्याचा जीवनमंत्र आहे.
शूटी शीयरवाटर
न्यूझीलंडच्या या पक्ष्याला मटन बर्ड किंवा टिटी असेही म्हणतात. स्थलांतरादरम्यान सर्वात जास्त काळ उड्डाण करण्यात पटाईत असलेल्या पक्ष्यांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. शूटी शीअरवॉटर दरवर्षी अंदाजे 64,000 किमी इतके उड्डाण करतो. झुंडीने राहण्यापेक्षा एकट्याने प्रवास करण्याची याची सवय आहे.
आर्कटिक टर्न
आर्क्टिक टर्न हे पक्षी स्थलांतरासाठी ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका दरम्यान दरवर्षी सुमारे 90,000 ते 96,000 किमी उड्डाण करतात. असे म्हणतात की वयाच्या 30 व्या वर्षी हा पक्षी पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर तीन वेळा पार करू शकेल इतके अंतर उड्डाण करतो. हे पक्षी वजनाने इतके हलके असतात की समुद्राचे वारे त्यांना लांब अंतरापर्यंत आपल्यासोबत घेऊन जातात.
ग्रेट स्नाइप
सर्वात वेगाने उड्डाण करण्याचा विक्रम ग्रेट स्निप नावाच्या स्थलांतरित पक्ष्याच्या नावावर आहे. याचा उडण्याचा वेग ताशी 97 किलोमीटर इतका आहे. त्याच्या चपळ उड्डाणामुळे तो स्वीडन ते आफ्रिका हे 6,760 किलोमीटरचे अंतर अवघ्या 2 दिवसांत कापून आपल्या नियोजित स्थानावर पोहोचतो. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या प्रवासादरम्यान ग्रेट स्नाईप ना विश्रांतीसाठी थांबतो ना पोटपूजा करण्यासाठी. मात्र, या दोन दिवसांच्या प्रवासात त्याच्या शरीराचे वजन निम्म्यापर्यंत नक्कीच कमी होते.
हमिंगबर्ड
हमिंगबर्ड हा सर्वात छोटा पक्षी आहे, जो स्थलांतरासाठी दुसऱ्या देशात जातो.रुफस ही हमिंगबर्डची एक प्रजाती असून ती अलास्कामधील तिच्या मूळ ठिकाणापासून मेक्सिकोपर्यंत 4,800 किलोमीटरचा एकेरी प्रवास करते. हा खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र पेटू आहे. प्रवासादरम्यान हा त्याच्या वजनाच्या दुप्पट किडे आणि परागकण फस्त करतो. रुबी-थ्रोटेड हमिंगबर्ड पनामा ते पूर्व अमेरिका असा 1,400 किलोमीटरचा प्रवास न थांबता करतो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली





No comments:
Post a Comment