Saturday, July 22, 2023

प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून पिता- पुत्रांनी उभा केला फॅशनेबल कपड्यांचा उद्योग


पर्यावरण संरक्षणात तामिळनाडूमधील पिता-पुत्र जोडी, के.  शंकर आणि सेंथिल शंकर यांचे योगदान विशेष आहे.श्री रेंगा पॉलिमर्स या त्यांच्या कंपनीमध्ये ते दररोज 15 लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर (रीसायकल) करतात. या बाटल्यांचा वापर केल्यानंतर लँडफिलमध्ये पोहचतात. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी एक उत्तम मार्ग शोधला आहे.या  वेस्ट मालापासून ते त्यांच्या कंपनीत फॅशनेबल कपडे बनवत आहेत. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर के. शंकर यांनी अनेक वर्षे परदेशात नोकरी केली.2008 मध्ये ते भारतात परतले आणि प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर काम करू लागले.  त्यांनी श्री रेंगा पॉलिमर्स नावाची कंपनी सुरू केली जी  प्लास्टिकच्या वेस्ट मालापासून कार्पेट बनवायची.

अनेक वर्षे त्यांनी अशा प्रकारे प्लास्टिकचा पुनर्वापर केला.आता त्यांचा मुलगा सेंथिल शंकर याला एक पाऊल पुढे टाकत आहे आणि प्लास्टिक कचऱ्याला शाश्वत फॅशनमध्ये बदलत आहे. सेंथिलने 2021 मध्ये इकोलाइन नावाचा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे. यामध्ये ते देशभरातील 50,000 कचरा वेचकांकडून प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून टी-शर्ट, पेंट्स आणि ब्लेझर यांसारख्या वस्तू बनवत आहेत. अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत सुमारे 50 लाख प्लास्टिकच्या बाटल्या लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवल्या आहेत. 

ते शर्ट बनवण्यासाठी 8 प्लास्टिकच्या बाटल्या आणि जॅकेट बनवण्यासाठी सुमारे 20 बाटल्या वापरतात. त्याचा ब्रँड अधिक प्रसिद्ध झाला जेव्हा फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थायी ब्रँड EcoLine ला प्रोत्साहन देण्यासाठी संसदेत त्यांनी बनवलेले जॅकेट परिधान केले. 25 प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून ते जॅकेट तयार करण्यात आले. पंतप्रधानांनी ते संसदेत तसेच जपान आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात परिधान केले होते. सेंथिल म्हणतात, “आम्ही ज्या ब्रँडसाठी खूप मेहनत घेतली आहे त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली याचा आम्हाला खूप आनंद आहे.त्या कार्यक्रमानंतर, आमच्या उत्पादनांच्या विक्रीत 25 टक्के वाढ झाली आहे.”

सध्या त्यांनी बनवलेल्या उत्पादनाची किंमत 500 ते 6000 रुपयांपर्यंत आहे. आज ते दरमहा 20,000 ऑर्डर्सद्वारे 12 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करत आहे. त्यांना त्यांच्या बहुतांश ऑर्डर्स कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून मिळतात. तुम्हालाही हे टिकाऊ जॅकेट स्वतःसाठी विकत घ्यायचे असेल, तर तुम्ही त्यांच्या वेबसाइटवर त्यांच्याशी संपर्क साधू शकता. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...