Wednesday, April 26, 2023

(ब्रेन पॉवर ) कीबोर्ड बटणे अल्फाबेटिकल सीरीजमध्ये का नाहीत?


वास्तविक, कीबोर्ड हा टाइपरायटरचा सुधारित प्रकार आहे.क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांनी 1868 मध्ये टाइपरायटरचा शोध लावला होता. सुरुवातीला टाइपरायटरची बटणे एबीसीडी मालिकेनुसारच होती, पण या बटणांच्या मदतीने टायपिंग करणे अवघड होत होते.त्यामुळे ही अडचण कमी करण्यासाठी कीबोर्डमध्ये अनेक बदल करण्यात आले आणि सर्वात आधी ज्या अक्षरांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यांची निवड करण्यात आली. यानंतर, ते बोटांच्या आवाक्यानुसार व्यवस्थित केले गेले आणि 1873 मध्ये, शोल्सने नवीन पद्धतीने बटणे असलेले टाइपरायटर तयार केले. याला Q,W,E,R,T,Y (Qwerty) असे नाव देण्यात आले आणि नंतर हे मॉडेल 'रेमिंग्टन अँड सन्स' ने शोल्सकडून विकत घेतले. 1874 मध्ये रेमिंग्टनने आणखी बरेच कीबोर्ड बाजारात आणले. जेव्हा संगणकाची सोय झाली तेव्हा लोकांच्या सोयीसाठी तोच  की -बोर्ड संगणकातही वापरला जाऊ लागला.संगणकात वापरला जाणारा कीबोर्ड आणि टाइपरायटरमध्ये वापरण्यात येणारी बटणे यात थोडा फरक आहे. हेच कारण आहे की संगणकाचा कीबोर्ड  अल्फाबेटिकल सीरीजमध्ये नाहीत.

Saturday, April 22, 2023

स्मार्ट सिटी' अंतर्गत 8 शहरांमध्ये 320 प्रकल्प सुरू

राज्यात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आठ शहरांमध्ये १७ हजार ४०२ कोटी खर्चून ३२० प्रकल्प सुरू केले आहेत. यापैकी २३६ प्रकल्प जवळपास पूर्ण झाले. उर्वरित ८४ वेळेत पूर्णत्वास जाऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत दोन वर्षांच्या अटीतटीच्या स्पर्धेनंतर जून २०१८ मध्ये १०० शहरांची यासाठी निवड करण्यात आली. यात राज्यातील  आठ शहरांचा समावेश आहे.  सर्वाधिक प्रकल्प ठाणे (५३), नाशिक (५०), सोलापूर (४९) आणि पुणे (४८) येथे आहेत. छत्रपती संभाजीनगरला ४६ प्रकल्पांसाठी ३,५४७ कोटी तर नाशिकला ३,१४० कोटीं निधी व त्यापाठोपाठ ठाण्याला २८७४ कोटी मिळाले. जून 2023 मध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर व ठाणे ही शहरे स्मार्ट सिटी म्हणून घोषित केली जातील. छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक निधी देण्यात आला आहे.

राज्यात 1 लाख 36 हजार कुपोषित बालके

राज्यात २०१९ - २०२२ या काळात १ लाख ३६ हजार ७३३ मुलांमध्ये तीव्र आणि अतितीव्र कुपोषण आढळून आले आहे. तर कुपोषणामुळे ६ हजार ५८२ बालकांचा मृत्यू देखील झाला आहे.आदिवासींमधील कुपोषणाची समस्या पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे. कुपोषणामुळे मृत्यू झालेल्यांपैकी तब्बल १५ हजार २५३ बालकांच्या मातांचे बालविवाह झाले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, ‘आयसीडीएस’चे उपायुक्त जी. व्ही. देवरे आणि आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. चौहान यांची समिती स्थापन केली होती.या समितीने २०१९ - २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीतील मुलांचे कुपोषण आणि त्यामागच्या कारणांचा अभ्यास केला. आशा सेविकांच्या माध्यमातून १ लाख ३३ हजार ८६३ कुपोषित मुलांच्या तसेच कुपोषणामुळे मृत्यू झालेल्यांच्या घरांमध्ये जाऊन ही पाहणी करण्यात आली आहे. या समितीने आदिवासीबहुल १६ जिल्ह्यांमध्ये ही पाहणी केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक कुपोषणाचे आणि बालविवाहाचे प्रमाणही नंदुरबार जिल्ह्यातच अधिक आढळून आले आहे. २०१९ - २०२२ या काळात नंदुरबारमध्ये ५६ हजार ९८४ तीव्र आणि अतितीव्र कुपोषित बालके होती.  त्या खालोखाल नाशिक, पालघर, ठाणे आणि गडचिरोलीमध्ये देखील बालविवाहामुळे बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक दिसते आहे.

भारताने तब्बल साडेसहा लाख हेक्टर जंगल गमावले

भारताने सन 2015 ते 2020 या काळात तब्बल सहा लाख 68 हजार 400 हेक्‍टर जंगल गमावले आहे. जंगलांच्या ऱ्हासाच्या संदर्भात भारत ब्राझीलपाठोपाठ दुसरा क्रमांकावर आहे. यासंदर्भातील अभ्यास https://ourworldindata.org/ या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. जगातील सुमारे 98 देशांमध्ये गेल्या 30 वर्षांत झालेल्या जंगलतोडीची माहिती या अभ्यासात दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले आहे.

वर्ष 1990 ते 2000 आणि 2015 ते 2020 या काळातील माहिती आणि आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आले आहे. जगाचा विचार करता मागील 30 वर्षात भारतात सर्वाधिक जंगलतोड झाली आहे. त्यातही, 2015 ते 2020 या काळात ही जंगलतोड प्रचंड प्रमाणात करण्यात आली. या काळात भारतात सहा लाख 68 हजार 400 हेक्‍टर जंगल तोडले गेले. 1990 ते 2000 या काळात तीन लाख 84 हजार हेक्‍टर जंगल देशाने गमावले होते. इतर देशांच्या तुलनेत देशातील जंगलतोडीची गती सर्वाधिक आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी ही जंगलांची तोड करण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जंगलतोडीचा वेगही अधिक सन 1990 ते 2000 या काळात झालेल्या ऱ्हासाच्या तुलनेत 2010 ते 2020 याकाळात भारतात झालेल्या जंगलतोडीचा वेग हा जगात सर्वाधिक आहे. या काळातील जंगलतोडीच्या वेगाच्या बाबतीत झांबिया दुसर्‍या क्रमाकांवर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात 1090 पर्यंत तृक्षतोडीचे प्रमाण आणि गती फारच कमी होती. मात्र, त्यानंतरच्या एका दशकात जंगलतोठीचे प्रमाण एकाएकी वाढले आणि पुढील प्रत्येक दशकात ही स्थिती कायम राहिली.
कारणे कोणती? वाढणारी लोकसंख्या, शेतजमिनीचे वाढलेले क्षेत्र, उपभोगाचे वाढलेले प्रमाण आणि हवामानबदल अशा विविध कारणांमुळे जंगलांचा ऱ्हास झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मार्च महिन्यातच हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

साडेचौदा लाख मतदार ओळखपत्रे आधारशी लिंक

सांगली जिल्ह्यात एकूण मतदार संख्या २४ लाख ८ हजार ५७३ असून, यामध्ये १२ लाख ३७ हजार ७८२ पुरुष तर ११ लाख ७० हजार ६८३ महिला व इतर मतदारांची संख्या १०८ आहे. यामधील १४ लाख ५२ हजार ४०३ मतदारांचे आधारकार्ड ओळखपत्राशी लिंक करण्यात आले आहे. आता ९ लाख ५६ हजार १७० मतदारांचे आधारकार्ड ओळखपत्राशी लिंक करण्यात येणार आहे. याची टक्केवारी ३९.७० टक्के इतकी आहे. सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी लिंक करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४ लाख ८ हजार ५७३ मतदारांपैकी १४ लाख ५२ हजार ४०३ मतदारांची ओळखपत्रे लिक करण्यात आली आहित. हे प्रमाण ६०.३० टक्के इतके आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात 3 लाख 21 हजार 534, सांगली मध्ये 3 लाख 26 हजार 66, इस्लामपूर तालुक्यात 2 लाख 77 हजार 456, शिराळा तालुक्यात 2 लाख 99 हजार 883, पलूस/कडेगाव 2 लाख 80 हजार 783, खानापूर 3 लाख 28 हजार 690, तासगाव / कवठेमहांकाळ 3 लाख 4 हजार 285, जत 2 लाख 69 हजार 876 मतदार आहेत.

राज्याच्या महसूल विभागात ३१ टक्के पदे रिक्त

महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागातील तब्बल ३१ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आता समोर आली आहे. ३३ हजार ४३४ पदांपैकी १० हजार ४४८ पदे रिक्त असून, यातील सर्वाधिक पदे ही ‘क’ संवर्गातील आहे. माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला महसूल विभागाच्या वतीने यासंबंधीचे उत्तर देण्यात आली आहे. सरळसेवा भरती रखडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे. राज्य सरकारने सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत म्हणून उमेदवार आक्रमक झाले आहे. ‘महसूल व वन विभागामध्ये वर्ग अ आणि ब बरोबरच क संवर्गातील सर्वाधिक पदे रिक्त आहे. यामध्ये तब्बल ५००० हून अधिक पदे ही तलाठ्यांची आहेत.

रिक्त पदांमुळे ग्रामिण भागातील यंत्रणांना अधिक ताण सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर नागरिकांनाही विविध सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. माहिती अधिकाराला उत्तर देताना महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट केले आहे. याद्वारे चार हजार ६८१ जागा भरण्यात येणार आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया केंव्हा पार पडेल याबद्दल स्पष्टता नाही.महसूल विभागातील महत्त्वाच्या पदांचे विवरण असे- संवर्ग - मंजूर पदसंख्या - रिक्त पदे उपजिल्हाधिकारी - ३०० - ५६, तहसिलदार - २०९ - ८५, अराजपत्रित लघुलेखक - १६६ - ९२मंडळ अधिकारी - ५७०९ - ९५४नायब तहसिलदार - ६३७ - २८१तलाठी - १५७४४ - ५०३०गटानूसार रिक्त पदांचे विवरण (पदोन्नतीसह) -गट - मंजूर पदसंख्या - रिक्त पदेअ - १५७७ - १४०ब - ३४०१ - ८८३क - ३९४७४ - ९९५६ड - ७७९१ - २३७५एकूण - ५२२४३ - १३३५४(३१ नोव्हेंबर २०२२ पर्यंतची आकडेवारी)

देशात ७५ हजार ३९४ कुष्ठरुग्ण

देशात २०२१-२२ या वर्षात ७५ हजार ३९४ कुष्ठरुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील १७ हजार १४ रुग्ण आहे. त्या खालोखाल बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक आहे. देशात २०१४-१५ मध्ये कुष्ठरोगींची संख्या एक लाख १५ हजार ७८५ होती. कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबविलेल्या उपाययोजना, उपचार पद्धतीमुळे कुष्ठरुग्णांची संख्या घटली. देशात २०१९-२० या वर्षी एक लाख १४ हजार ४५१ कुष्ठरुग्ण होते. यात पुढील वर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये जवळपास ४३ टक्क्यांची घट होऊन रुग्णांची संख्या ६५ हजार १४७ आली. मात्र २०२१-२२ या वर्षात १५.७ टक्क्यांची वाढ होऊन रुग्णांची संख्या ७५ हजार ३१४ झाली आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (एनएलईपी) मध्ये दरवर्षी केंद्राकडून राज्यांना निधी दिली जातो. यात महाराष्ट्राला २०१९-२० या वर्षी ४.८३ कोटी, २०२०-२१ या वर्षी ३.७६ कोटी तर २०२०-२१ या वर्षी २.१२ कोटी रुपये देण्यात आले.

कुष्ठरुग्णाचे तीन प्रकार वर्गीकरण केले गेले आहे. यात ‘ट्युबरक्युलॉइड कुष्ठरोग’, ‘लेप्रोमेटास कुष्ठरोग’ आणि ‘बॉर्डर लाइन’ असे तीन प्रकार विभागले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कुष्ठरोगाचे ‘पॉकीबॅकिलरी’ आणि ‘मल्टिबॅकिलरी’ असे वर्गीकरण केले आहे. ‘पॉकीबॅकिलरी’ प्रकारात त्वचेवर पाचपेक्षा कमी चट्टे असतात तर ‘मल्टीबॅकिलरी’ प्रकारात पाचपेक्षा जास्त कुष्ठरोगाचे चट्टे असतात.
देशातील कुष्ठरोग असलेल्यांची संख्या (जानेवारी २०२३ पर्यंतची आकडेवारी)महाराष्ट्र १७,०१४बिहार ११,३१८उत्तर प्रदेश १०,३१२छत्तीसगड ७,४२२मध्य प्रदेश ७,३१३झारखंड ६,१८४ओडीसा ६,०८८पश्‍चिम बंगाल ५,०१२आंध्र प्रदेश २,७६९गुजरात २,६६२कर्नाटक २,०९१तमिळनाडू २,५९१तेलंगणा २,५६४दिल्ली १,१८८राजस्थान ९६९आसाम ७१९ हरियाणा ३६६हिमाचल प्रदेश १३२पंजाब ३६५केरळ ३८४उत्तराखंड २९४

Sunday, April 16, 2023

तुम्हालाही फोनचे व्यसन आहे का? तुम्हालाही आता यातून सुटका हवी आहे का?


मानवी शरीराच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण सोशल मीडिया कसे आणि किती काळ वापरतो यावर अवलंबून आहे. बरेच लोक त्यांच्याविषयी किंवा त्यांची कथा सांगण्यासाठी आणि इतर लोकांबद्दल जाणून घेण्यासाठी किंवा शॉर्ट व्हिडिओ तयार करण्यासाठी, पाहण्यासाठी  सोशल मीडियाचा वापर करतात.सोशल मीडिया तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे हे वास्तव आहे. त्यामुळे सोशल मीडिया आपल्याला कसा वाटतो हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात अतिरिक्त आनंद मिळवत असाल किंवा सोशल मीडियाच्या वापरामुळे तुमची झोप कमी होत असेल किंवा तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या या सूचनांद्वारे तुमचे आयुष्य आणि नातेसंबंध सुधारू शकता. 

प्रश्न. तुम्ही तुमचा जास्त वेळ पोस्ट शेअर करण्यापेक्षा किंवा इतरांशी चॅट करण्यापेक्षा स्क्रोल करण्यात  घालवता का?

उत्तर- ऑनलाइन मैत्री केल्याने आपले नैराश्य आणि चिंतापासून संरक्षण होते आणि ज्या लोकांना मोबाईलवर स्क्रोल करायला आवडते त्यांना कालांतराने अधिक दुःख होते.सोशल मीडिया लोकांना एकत्र आणण्याचा दावा करतो, परंतु तसे होत नाही कारण आपण सोशल मीडियावर स्वतःची इतरांशी तुलना करण्यात किंवा कनेक्शन बनवण्याऐवजी सकारात्मक प्रतिक्रिया शोधण्यात अडकतो. 

प्रश्न. सोशल मीडियाचा वापर केल्याने तुम्हाला चिंता वाटते की वाईट वाटते?

उत्तर-  तुमच्या सोशल मीडियाच्या सवयी तुम्हाला मदत करत आहेत की दुखावत आहेत याबाबत तुमचे शरीर तुम्हाला मौल्यवान संकेत देते.एका अहवालात असे सुचवले आहे की जर तुमचे शरीर किंवा मन सुन्न होत असेल किंवा तुम्हाला काही प्रकारचे निराकरण करण्यासाठी स्क्रोल करत राहण्याचा दबाव वाटत असेल, तर तुम्ही हळूहळू सोशल मीडियापासून स्वतःला दूर केले पाहिजे. 

प्रश्न. सोशल मीडियामुळे तुमची झोप खराब होते का?

उत्तर- अहवालानुसार, संयुक्त राज्य अमरीका (युनायटेड स्टेट) मधील जवळजवळ एक तृतीयांश प्रौढांना पुरेशी झोप मिळत नाही.त्यामुळे त्यांच्या शरीरातील आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. जास्त वेळ मोबाईल स्क्रोल केल्याने डोळ्यांची दृष्टी तर कमी होतेच पण झोपेवरही परिणाम होतो. म्हणूनच रात्रीच्या ठराविक वेळेत आपण आपल्या मोबाईलचे सर्व अॅप्स लॉग ऑफ केले पाहिजेत.  यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे रक्षण होऊ शकते. 

Thursday, April 13, 2023

जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील या दोन नवीन स्थळांचा आहे समावेश


मुलांनो, दोन वर्षांपूर्वी (वर्ष २०२१ मध्ये), युनेस्कोने भारतातील आणखी दोन स्थळांची नावे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केली आहेत.पहिले ठिकाण आहे रामाप्पा मंदिर, दुसरे स्थान धौलावीरा.  दरवर्षी 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युनेस्को द्वारे साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे की जगातील मानवी संस्कृतीशी निगडित प्राचीन सांस्कृतिक स्थळांचे महत्त्व समजणे, त्यांच्या अस्तित्वाला असलेले संभाव्य धोके जाणून घेणे, तसेच त्यांच्या संवर्धनासाठी जागरुकता आणणे. मुलांनो, युनेस्कोही वेळोवेळी जगभरातील प्राचीन वारसा स्थळांची यादी बनवते, या स्थळांची काळजी घेणाऱ्या राष्ट्राला आर्थिक मदतही करते. 2021 मध्ये या यादीत आपल्या देशातील दोन ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यासह, आता भारतात एकूण 40 जागतिक वारसा स्थळे झाली आहेत. तेलंगणामधील रामाप्पा मंदिर 39 वे स्थान जोडले, जे त्याच्या अद्वितीय शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.  गुजरातमधील घौलावीरा हे 40 वे ठिकाण आहे, जे हडप्पा शहर होते.

रामाप्पा मंदिर, तेलंगणा
मुलांनो, तेलंगणा राज्यातील काकतिया रुद्रेश्वर हे रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते.रामाप्पा मंदिर हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर आहे.  हे उत्तर-पूर्वेला पालमपेट गावात आहे. हे मंदिर 1213 मध्ये काकतीय शासक गणपती देव यांच्या कारकिर्दीत त्याच्या सेनापती रेचरला रुद्रदेव यांनी बांधले होते.  रामलिंगेश्वर स्वामी हे येथील प्रमुख दैवत आहेत.काकातीयांच्या मंदिर संकुलांमध्ये एक वेगळी शैली, तंत्रज्ञान आणि सजावट आहे जे काकातीयन शिल्पकाराचा प्रभाव दर्शवितात. मंदिरातील शिल्पे प्रादेशिक नृत्य-कला आणि काकतीय संस्कृती दर्शवतात. रामप्पा मंदिर हे काकातीयन सर्जनशील अलौकिकतेचे प्रशंसापत्र म्हणून उभे राहते.   तेराव्या शतकात बांधलेले हे मंदिर आजही भक्कमपणे उभे आहे.  हे मंदिर कारागीर रामप्पा यांनी बांधले होते. मंदिराला रामप्पाचे नाव देण्यात आले आहे. हे बहुधा जगातील एकमेव असे मंदिर आहे, ज्याचे नाव त्यात स्थापित केलेल्या देवतेच्या नावावरून नाही तर कारागिराच्या नावावरून ठेवलेले आहे. मंदिर लाल वाळूच्या दगडाने बनवलेले आहे, मूर्ती काळ्या ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली आहे.दगड सामान्य दिसत असले तरी ते अतिशय अनोखे आहेत, कारण हे दगड अतिशय कठीण आणि वजनाने खूप हलके आहेत. दगड इतके हलके असतात की पाण्यात टाकल्यावर ते बुडत नाहीत तर तरंगतात. हेच रामप्पा मंदिराला जगातील सर्वात खास बनवते. 25 जुलै 2021 रोजी, हे मंदिर "काकतिया रुद्रेश्वरा (रामप्पा) मंदिर" म्हणून युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून समाविष्ट करण्यात आले. मंदिराला अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. यात फक्त भारतीय नाही तर अन्य देशातील पर्यटकही असतात. युरोपियन व्यापारी आणि पर्यटक मंदिराच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले. अशाच एका प्रवाशाने असे म्हटले होते की हे मंदिर म्हणजे "दक्कनच्या मध्ययुगीन मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा" आहे.


धोळावीरा, गुजरात
धोळावीरा भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भचाऊ तालुक्यातील खदीरबेट या मोठ्या गावाजवळ असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. कच्छ वाळवंटी वन्यजीवन अभयारण्याचा भाग असलेले हे प्राचीन गाव १०० हेक्टरमध्ये पसरलेले असून येथे इ.स.पू. २६५० ते इ.स.पू. २१०० पर्यंत वस्ती होती. काही शतके निर्मनुष्य राहिल्यावर इ.स.पू. १४५०च्या सुमारास येथे पुन्हा एकदा मनुष्यवस्ती आली. एकेकाळी हे गाव मासर आणि मनहर नद्यांच्या संगमावर वसलेले होते.हे ठिकाण हडप्पा संस्कृतीचे दक्षिणेकडील केंद्र मानले जाते. हे हडप्पा काळातील पाचवे मोठे शहर मानले जाते, जे सुमारे 50 हेक्टरमध्ये पसरलेले आहे. धोळावीराचा शोध जगत्पती जोशी यांनी 1967-68 मध्ये लावला होता. त्याचे तपशीलवार उत्खनन रवींद्र सिंग बिस्त यांनी १९९०-९१ मध्ये केले होते. धोळावीरा शहर नियोजन, तटबंदी आणि जल व्यवस्थापन प्रणाली द्वारे वैशिष्ट्यीकृत होते. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, धोळावीरा ही एक मोठी मानवी वस्ती होती, ज्याची लोकसंख्या 20 हजारांहून अधिक होती. गुजरात पर्यटन विभागाच्या वेबसाइटनुसार, टेराकोटाची भांडी, सोन्याचे आणि तांब्याचे दागिने, मासेमारीचे हुक, प्राण्यांच्या मूर्ती, साधने, फुलदाण्या आणि काही महत्त्वाची भांडी येथे सापडली आहेत. धोळावीरा हे भारतातील दोन मोठ्या हडप्पा स्थळांपैकी एक आहे.  हे उपखंडातील 5 वे सर्वात मोठे साइट आहे. धोळावीरामध्ये जगातील सर्वात जुनी जलसंधारण प्रणाली आहे. 27 जुलै 2021 रोजी 'धोळावीरा: द हडप्पा सिटी' या नावाने युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला.  अशाप्रकारे, ही दोन्ही ठिकाणे भारताचा अभिमानास्पद वारसा आहेत, ज्याचा आपल्याला जगात अभिमान आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Monday, April 10, 2023

जगातील 75 टक्के वाघ एकट्या भारतात!


वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.वाघ हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. दुर्गादेवीचे वाहन म्हणून सन्मान मिळालेला हा रुबाबदार वाघ आपल्या देशात वाघ, व्याघ्र, टायगर, बाघ, पूली, कडुवा व हुली आदी नावांनी विविध भाषांमध्ये ओळखला जातो. जगात वाघाच्या (पँथेरा टायग्रीस) सहा उपजाती अस्तित्वात आहेत. भारतीय (बंगाल), सायबेरियन, इंडो-चायनीज, मलायन, दक्षिण चिनी व सुमात्रन या जाती सध्या अस्तित्वात आहेत तर कॅस्पियन, जावन व बालिनीज जाती नष्ट झाल्या आहेत. भारतात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक ,गोवा आणि केरळ राज्यांमध्ये वाघ आहेत.

 जगातील 75 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. गेल्या दशकात वाघांची संख्या दुप्पट झाली आहे. व्याघ्र संरक्षण प्रकल्पांच्या निर्मितीमुळे चांगला अधिवास उपलब्ध  झाल्याने वाघांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 1973 मध्ये वाघांची संख्या केवळ 268 होती.  व्याघ्र योजनेला 50 वर्षे पूर्ण होणे हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. 1973 मध्ये नऊ व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेली व्याघ्र संवर्धन योजना 53 राखीव क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. 23 व्याघ्र संरक्षित क्षेत्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.  मध्य प्रदेशानंतर, कर्नाटक, उत्तराखंड आणि नंतर महाराष्ट्र आघाडीवर आहे. व्याघ्र प्रकल्पानुसार ताडोबा हा आठव्या क्रमांकावर आहे. वाघांच्या मृत्यूचा विचार केल्यास सर्वांत जास्त वाघ हे नैसर्गिक कारणामुळे मरतात. त्यानंतर अपघात आणि शिकारीमुळे वाघांचा मृत्यू होतो. देशातील व्याघ्र प्रकल्पात चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली आहे.  महाराष्ट्रात बोर, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, पेंच, सह्याद्री आणि ताडोबा असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांपेक्षा ताडोबात सर्वाधिक दोनशेहून अधिक वाघ आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तर व्याघ्र प्रकल्पाबाहेर जास्त वाघ आहेत. गडचिरोली येथे पूर्वी एकही वाघ नव्हता, तिथे आता वीसच्या वर वाघ आहेत. तिथेही वाघांच्या मानवावरील हल्ल्यात वाढ होत आहे. 1973 नंतर 2008 मध्ये पहिल्यांदा वाघांची गणना करण्यात आली. त्यानंतर त्याची संख्या 1401 होती. देशांत 2022 च्या गणनेनुसार तीन हजार 167 वाघ आहेत . 2018 च्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात वाघांची संख्या 2 हजार 967 होती. सर्वाधिक 526 वाघ हे मध्यप्रदेशात आहेत, कर्नाटकात 524, उत्तराखंडात 442 आणि महाराष्ट्रात 312 वाघ आहेत. दरवर्षी वाघांची संख्या सहा टक्के दराने वाढते आहे; परंतु गेल्या दोन वर्षात ही संख्या जास्त वाढली आहे.  महाराष्ट्रात तीनशेहून अधिक वाघ आहेत. त्यापैकी केवळ चंद्रपूर जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक आहेत. हमखास व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, April 8, 2023

रॉकेटचे इंजिन किती खास आहे!


रॉकेट इंजिन हे जेट इंजिनपेक्षा थोडे वेगळे असते. जेट इंजिन हवेतून ऑक्सिजन घेऊन काम करतात, तर रॉकेट इंजिन त्यांच्यासोबत आवश्यक सर्वकाही घेऊन जातात. रॉकेट इंजिन अवकाशातही काम करते, जिथे हवा नसते. रॉकेट इंजिन देखील इतर इंजिनांप्रमाणे काम करते. ते इंधन जाळून थ्रस्ट निर्माण करते. थ्रस्टचा सरळ अर्थ आहे धक्का. म्हणजेच पुढे जाण्यासाठी ते यानाला धक्का देते. बहुतेक रॉकेट इंजिन इंधनाचे रूपांतर गरम वायूमध्ये करतात. इंजिन हा वायू मागच्या बाजूने सोडते, ज्यामुळे रॉकेटला पुढे नेण्यास मदत होते. अंतराळात असे काहीही नाही जे पुढे जाण्यासाठी इंजिनद्वारे ढकलले जाऊ शकते. अशा स्थितीत प्रश्न पडतो की मग रॉकेट पुढे कसे चालेल? न्यूटनच्या गतीच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे रॉकेट कार्य करते. या नियमानुसार, प्रत्येक क्रियेची समान आणि विरुद्ध दिशेची प्रतिक्रिया असते. रॉकेटचे इंजिन वायूला बाहेरच्या दिशेने धक्का देते. या प्रक्रियेत वायूदेखील रॉकेटला समान शक्तीने पुढे ढकलतो. 

विकासाचा प्रवास रंजक आहे

1903 मध्ये, रशियन शिक्षक कॉन्स्टँटिन त्सीओलकोव्स्की यांनी द्रव इंधन असलेल्या रॉकेटवर एक पेपर लिहिला. यानंतर, 1926 मध्ये, अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट गोडार्ड यांनी पहिले द्रव इंधन असलेले रॉकेट उडवले. हर्मन ऑबर्ट यांच्या नेतृत्वाखालील जर्मन शास्त्रज्ञांनी द्रव इंधन असलेले रॉकेट विकसित केले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने इतर देशांवर बॉम्ब टाकण्यासाठी रॉकेटचा वापर केला होता. 1957 मध्ये सोव्हिएत युनियनने पहिला उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी रॉकेटचा वापर केला. 1961 मध्ये, सोव्हिएत अंतराळवीर युरी गागारिन रॉकेटद्वारे अंतराळात जाणारी पहिली व्यक्ती बनली. 1969 साली अमेरिकेने अपोलो मोहिमेतून नील आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांना चंद्रावर पाठवले. त्या मोहिमेत सॅटर्न व्ही रॉकेटचा वापर करण्यात आला होता. 

त्याचा शोध कधी लागला

12व्या शतकाच्या आसपास चीनमध्ये रॉकेटचा शोध लागला असे मानले जाते. या घन रॉकेटचा वापर फटाक्यांसाठी करण्यात आला. त्यांचा उपयोग सैन्याने युद्धातही केला. 13व्या शतकात, या रॉकेटचा उपयोग आशिया आणि युरोपच्या बर्‍याच भागात फटाके आणि युद्धात केला जात होता. पुढील 600 वर्षांत, लोकांनी मोठे आणि चांगले घन रॉकेट विकसित केले. यापैकी बहुतांश सैन्याने वापरले होते. 

दोन प्रकारचे रॉकेट इंधन

रॉकेट इंजिनचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. काही इंजिने द्रव इंधन वापरतात. स्पेस शटल ऑर्बिटरचे मुख्य इंजिन द्रव इंधन वापरतात.रशियाची सोयुझदेखील हेच इंधन वापरते. इतर रॉकेट इंजिनमध्ये घन इंधन वापरले जाते. स्पेस शटलच्या बाजूला दोन पांढरे घन रॉकेट बूस्टर असतात. तेदेखील घन इंधन  वापरतात. आतिशबाजीसाठी वापरले जाणारे फटाके  किंवा रॉकेट आणि मॉडेल रॉकेट घन इंधन वापरतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

(नॉलेज कॉर्नर) रिमोटचा शोध कोणी लावला?

 


1. रिमोटचा शोध कोणी लावला?

उत्तर- 1898 मध्ये, निकोला टेस्ला यांनी अमेरिकेतील पहिल्या रिमोटचे पेटंट घेतले जे दूरस्थपणे पाण्यावर बोट चालवू शकत होते. रिमोट कंट्रोलचा सामान्य अर्थ म्हणजे इन्फ्रारेड चुंबकीय स्पेक्ट्रमसह टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवणे. सुदूर अवकाशात जाणाऱ्या यानांवरही दुरूनच नियंत्रण ठेवले जाते.  अनेक देशांमध्ये, मेट्रो ट्रेन ड्रायव्हरशिवाय रिमोट कंट्रोल द्वारा चालवल्या जात आहेत. आपण ज्या रिमोट कंट्रोल गॅझेट्सबद्दल बोलत आहोत ते सुमारे पाच मीटर अंतरापर्यंतचे काम करतात. हे रिमोट अनेकदा इन्फ्रारेड वापरतात. सत्तरच्या दशकापूर्वीचे रिमोट अल्ट्रासोनिक लहरीचा वापर करत होते. रेडिओ तंत्रज्ञानाचा शोध लागल्यानंतर रेडिओ लहरींद्वारे संदेश पाठवणेही सुरू झाले. प्रारंभिक रिमोट कंट्रोल रेडिओ लहरींद्वारे ऑपरेट केले जात होते. आता त्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोशन सेन्सर आणि व्हॉइस कंट्रोल यांचाही समावेश आहे. 

2. तारे का चमचम करतात?

उत्तर- सूर्यमालेचे सदस्य असल्याने ग्रह पृथ्वीच्या जवळ आहेत. ग्रह आणि आपले डोळे यांच्यामध्ये एक पातळ वातावरण आहे. त्यातून जाणाऱ्या प्रकाशकिरणांना जास्त अपवर्तनाचा सामना करावा लागत नाही. ते स्थिर असल्याचे दिसून येते. पृथ्वी आणि तारे यांच्यातील अंतर खूप मोठे आहे. प्रकाशकिरण अनेक माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचतात.  त्यामुळे तारे चमकू लागतात. 

3. किती देशांनी अणु चाचण्या (अणुस्फोट) केल्या आहेत?

उत्तर- अमेरिकेने 16 जुलै 1945 रोजी पहिली अणुचाचणी केली होती. तेव्हापासून 1992 पर्यंत अमेरिकेने 1,032 अणुचाचण्या केल्या आहेत. सोव्हिएत युनियनने 727 चाचण्या घेतल्या, परंतु 1992 मध्ये त्याचे विघटन झाल्यापासून एकही चाचणी घेतली गेली नाही. ब्रिटनने 88 चाचण्या घेतल्या आणि शेवटची चाचणी 1991 मध्ये घेण्यात आली. फ्रान्सने 217, चीनने 47, भारताने सहा, पाकिस्तानने सहा आणि उत्तर कोरियाने चार चाचण्या घेतल्या आहेत. याशिवाय जपान, इस्रायल, दक्षिण आफ्रिका आणि जर्मनीनेही अणुचाचण्या घेतल्याचे समजते. असे मानले जाते की जगात आतापर्यंत 2,121 अणुचाचण्या घेण्यात आल्या आहेत.

4. पर्स आणि बेल्टचा ट्रेंड कधीपासून आहे?

उत्तर- बटुआ किंवा वॉलेट हा शब्द शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. आज तुम्ही खिशात असलेली चामड्याची पर्सही अठराव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत युरोपमध्ये प्रचलित झाली. प्राचीन काळी त्यात नाणी ठेवली जात.  कागदी नोटांची प्रथा चीनमध्ये 7व्या ते 11व्या शतकादरम्यान सुरू झाली. आपल्या देशात जुन्या पोटलीने मधल्या काळात दोरी असलेल्या बटवेचे रूप घेतले होते. जोपर्यंत बेल्टचा संबंध आहे, तो देखील जुन्या कमरबंदचा एक नवीन प्रकार आहे. ताम्रयुगापासून मानवांनी त्याचा वापर सुरू केला.  आधुनिक लेदर बेल्टचा वापर 19व्या शतकात लष्करी गणवेशापासून सुरू झाला. 

Friday, April 7, 2023

अंगणवाडी दत्तक धोरण फायदेशीर


अंगणवाडी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर लहान मुलांसह आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका पार पाडावी लागते. अनेक ठिकाणी अंगणवाडी भाड्याच्या खोलीमध्ये भरते. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न, अशा अनेक अडचणींना तोंड देत अंगणवाडी सेविकांचे काम सुरू आहे. यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 759 अंगणवाड्या दत्तक देण्यात येणार आहेत.अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर 2022 पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत 3668 अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 4418 अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत आहे. राज्यात 1 लाख 10 हजार 446 अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणांतर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. दालमिया फांउडेशन यांनी सोलापूर-कोल्हापूरमधील 10 अंगणवाड्या दुरुस्तीसाठी, भागीरथी फांउडेशनने पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे 15 अंगणवाडी दुरुस्तीसाठी, कॉरबेट फाउंडेशन पुणे येथे 16 अंगणवाड्या दुरुस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद यांनी पुणे येथील 20 अंगणवाडी दुरुस्ती व क्षमता वृद्धी, आरएसएस जनकल्याण समितीने मुंबई उपनगरमधील 25 अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन यांनी पुणे येथे 41 अंगणवाडी दुरुस्ती व क्षमता वृद्धी,युनायटेड वे दिल्ली पुणे 45 अंगणवाडी दुरुस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 यांनी पुणे येथील 100 अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन गडचिरोली, नंदूरबार 179 अंगणवाडी दुरुस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे 300 अंगणवाडी दुरुस्ती, न्युट्रीशियन, जीवनंदन फाऊंडेशन यांनी पुणे येथील सहा अंगणवाड्या, मुस्कान प्रतिष्ठानने मुंबई उपनगर येथील सात अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांना 20 टक्के आणि साहाय्यकांना 10 टक्के वाढीव मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिसांची 20 हजार 183 पदे मे महिन्यापर्यंत भरण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यासाठी सरकारने 150 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरी भागात नव्या पद्धतीने अंगणवाड्या सुरू करण्यात येणार आहेत.

 

जगातील सर्वात मोठी शाळा कुठे आहे?


सिटी मान्टेसरी स्कूल (सीएमएस) ही जगातील सर्वात मोठी शाळा आहे. ही शाळा भारतातील सर्वांत मोठ्या राज्य उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात आहे. संपूर्ण शहरात पसरलेल्या 20 कॅम्पससह शाळेत 1000 पेक्षा जास्त वर्गखोल्या आणि 3700 संगणक आहेत. शाळेत 4500 कर्मचाऱ्यांची संपूर्ण फौज आहे ज्यात शिक्षक, सहाय्यक कर्मचारी, सफाई कामगार, रिक्षाचालक आणि अगदी इलेक्ट्रिशियन, सुतार आणि माळी यांचा समावेश आहे. जगदीश गांधी यांनी 1959 मध्ये केवळ पाच विद्यार्थ्यांसह स्थापन केलेल्या या शाळेत आता 58,000 विद्यार्थी आहेत. ही शाळा पूर्व प्राथमिक, प्राथमिक, कनिष्ठ आणि कनिष्ठ 4 या चार भागात चालते. एकाच शाळेच्या इमारतीत 5 ते 17 वयोगटातील 7500 हून अधिक विद्यार्थ्यांना शिकवणे हे सोपे काम नाही. परंतु सिटी मान्टेसरी यांनी ते केले आहे. 'जगातील सर्वात मोठी शाळा' म्हणून या शाळेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. सीएमएस मुलांचा सर्वांगीण विकास, नैतिक चारित्र्य निर्माण, जागतिक दृष्टीकोन आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनावर भर देते. सीएमएसमधील प्री प्रायमरी मुलांमध्ये आनंदाने भरलेल्या, सुरक्षित आणि आनंदी वातावरणात शिकण्यासाठी कुतूहल आणि शोधाचे गुण विकसित करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड, सामाजिक कौशल्ये, नैतिक मूल्ये आणि आत्मविश्‍वास विकसित करण्यावर भर दिला जातो. शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या कल्पना शोधण्यात, शिकण्यास, समजून घेण्यास आणि तयार करण्यात मदत करतात. 

Sunday, April 2, 2023

(नॉलेज ट्रॅव्हल्स) तवांगचे मनमोहक सौंदर्य


तवांग हे अरुणाचल प्रदेशात आहे. हे देशातील सर्वात मोठ्या बौद्ध मठासाठी देखील ओळखले जाते. येथे दऱ्या, नद्या आणि धबधबे, हिरवळ विशेषतः पर्यटकांना  आकर्षित करतात. तवांगच्या निसर्गसौंदर्याने पर्यटक मंत्रमुग्ध होतात. तवांग मठ हा भारतातील सर्वात मोठा मठ आहे. हे तवांग नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. मठात हस्तलिखिते, पुस्तके आणि इतर कलाकृतींचा अद्भुत संग्रह आहे. येथील नुरानंग धबधबा 'जंग फॉल्स' म्हणूनही ओळखला जातो. ते सुमारे शंभर मीटर उंचीवर आहे. बुमला दरीचे अफाट सौंदर्य पर्यटकांना आनंदित करते. येथील तवांग युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) चाळीस फूट उंचीवर वसलेले असून ते स्तूपाच्या रचनेच्या रूपात बांधलेले आहे. हे स्मारक भारत-चीन युद्धातील हुतात्म्यांना समर्पित आहे. हे स्मारक सुंदर शिखरांच्या मध्ये वसलेले आहे. या स्मारकाला नामग्याल चोरटेन असेही म्हणतात. तवांगची संस्कृती, सण, उत्सवही पर्यटकांना खूप आकर्षित करतात. तवांगच्या खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर भात हे येथील लोकांचे मुख्य अन्न आहे. भोजनात मका-बाजरीही वापरली जाते. वांगी, भोपळा, मोहरीची पाने, बांबूच्या नवीन कोंबांच्या भाज्याही मोठ्या चवीने खातात. ड्राय फिश फ्लेक्स, रोस्टेड कॉर्न फ्लेक्स, फ्राईड राईस फ्लेक्स, तांदळाची भाकरी, जंगल कंद, आपोंग, मारुआ, किंग-मिरची आणि डुकराचे मांस हे देखील येथील लोकांचे आवडते खाद्य आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

(नॉलेज ट्रॅव्हल्स) सनलिट सिटी ल्हासा


तिबेटची राजधानी ल्हासा हे जगातील सर्वात उंच शहर आहे. हे शहर सूर्यप्रकाशाचे शहर म्हणजेच सनलिट सिटी म्हणूनही ओळखले जाते. स्थानिक भाषेत याला देवांची भूमी असेही म्हणतात. हे शहर ल्हासा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले आहे. ही यारलुंग झांगपू नदीची शाखा आहे. येथील किल्ले, राजवाडे, उद्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. ल्हासाचा पोटाला पॅलेस तिबेटी लोकांच्या धार्मिक श्रद्धेचे केंद्र आहे. त्याची वास्तुकला आकर्षक आहे. याला ज्ञानाचे प्रतीक देखील मानले जाते. तेरा मजली या महालात एक हजाराहून अधिक खोल्या आहेत. हा पॅलेस पांढरा आणि लाल अशा दोन प्रकारात विभागलेला आहे.  जोखाग मंदिर हे तिबेटमधील सर्वात महत्त्वाचे आणि जुने मंदिर आहे. जोखांग म्हणजे तिबेटी भाषेत बौद्ध मंदिर. याची 'तिबेटचा पहिला मठ' अशी मान्यता आहे. जगभरातून बौद्ध धर्मीय येथे दर्शनासाठी येतात. जोखांग मंदिराभोवतीचा वर्तुळाकार रस्ता बारखोर स्ट्रीट किंवा बाजार म्हणून ओळखला जातो. येथील नारबुलिंगका पार्क हे दलाई लामांचे उन्हाळी निवासस्थान होते. म्हणूनच याला समर पॅलेस असेही म्हणतात. सेरा मठ (मॉनेस्ट्री) सुंदर गुलाबाच्या बागांनी वेढलेले आहे. तिबेटी भाषेत सेरा म्हणजे जंगली गुलाबांची बाग. ल्हासाच्या पश्चिमेला ड्रेपांग मठ आहे. पोटाला पॅलेस बांधण्यापूर्वी याच मठात दलाई लामा राहत होते. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...