Friday, September 1, 2023

ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकाने बनवला रोबोट


रोबोट आता बरीच कामे करीत आहे. घर, ऑफिस ची साफसफाई करतो, जेवण सर्व्ह करतो. गाणी म्हणतो, रुग्णांची सेवा करतो. इतकेच नव्हे तर रोबोट रुग्णांवर शस्त्रक्रियादेखील करू शकतो. अलीकडच्या काळात रोबोट काही शाळांमध्ये अध्यापनाचेही काम करू लागला आहे. कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी येथील शाळेत असाच एक रोबोट मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. 

कर्नाटकातील अक्षय माशेलकर या ३० वर्षीय शिक्षकाने मुलांना शिक्षण देण्याचा मार्ग मनोरंजक बनवण्यासाठी 'शिक्षा' नावाचा रोबोट तयार केला आहे. लॉकडाऊन काळात त्यांना ही कल्पना सुचली. मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून त्यांनी रोबोट बनवला. ते 'शिक्षा' रोबोटच्या मदतीने चौथीपर्यंतच्या मुलांना शिक्षण देत आहेत. तो तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन लाख रुपये खर्च आला.  हा रोबोट कन्नड आणि इंग्रजीमध्ये शिकवतो.

अक्षय म्हणतात, मीदेखील खेड्यातच वाढलो आहे, त्यामुळे या ठिकाणची व्याप्ती आणि मर्यादा मला माहीत आहे. तसेच त्या समजूनही घेतल्या आहेत. मुद्रित तक्ते आणि ब्लॉक्स अजूनही इथल्या शाळांमध्ये वापरले जात आहेत. कोरोना काळात याची मर्यादा लक्षात आली. भौतिकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर मुलांना शिकवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अभ्यासाला रंजक बनवण्यासाठी कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी रोबोट तयार केला आहे. हा रोबोट वार, दिनांक सांगतो, कविता गायन करतो, स्पेलिंग वाचन, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द सांगतो. तसेच विविध आकाराची नावे सांगतो, इंग्रजी वर्णमाला, बेरीज आणि वजाबाकी तसेच टेबल वाचन यासह अनेक गोष्टी मुलांना शिकवतो. मुलांना प्रश्न विचारतो. बरोबर उत्तर आलेल्या विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करून कौतुक करतो. उत्तर चुकल्यास दुरुस्त करून सांगतो. श्री. माशालेकर म्हणाले की, अजून या रोबोटवर काम सुरू असून अध्यापनाबरोबरच जनरल नॉलेजवरही काम सुरू आहे.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली



No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...