Thursday, August 31, 2023

सहज दिसणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत घट

देशात सहज दिसणाऱ्या पक्ष्यांची संख्याही आता सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे देशातील पक्ष्यांच्या संवर्धन आणि संरक्षणावर विशेष भर देण्याची गरज असल्याचा निष्कर्ष स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स २०२३'च्या  नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात नमूद आहे. अहवालात अनेक महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. 

स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स (एसओआयबी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अहवालात देशात नियमितपणे आढळणाऱ्या बहुतेक प्रजातींच्या क्षेत्र आणि वर्गवारीप्रमाणे मूल्यांकन केले जाते. २०२३ च्या अहवालाच्या निकषांप्रमाणे तसेच संवर्धन स्थितीचे मूल्यांकन करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. एसओआयबीचा पहिला अहवाल २०२० मध्ये प्रकाशित झाला होता. दुसऱ्या अहवालात ३० दशलक्षांहून अधिक पक्षीनिरिक्षणांची नोंद ३० हजाराहून अधिक पक्षीअभ्यासकांनी करून त्याचे मूल्यांकन केले आहे. 

अहवालातील बाबी -

● ३० दशलक्ष हून अधिक निरीक्षणे 

● ३०,००० हून अधिक पक्षीनिरीक्षक 

●९४२ पक्षी प्रजातींची संवर्धन प्राधान्याला वर्गवारी 

● १४ प्रजाती - आययूसीएन कडे पुनर्मूल्यांकनासाठी 

●१७८ प्रजाती - सर्वोच्च संवर्धन प्राधान्य 

●२१७ प्रजाती - स्थिर आणि संख्या वाढणाऱ्या 

● स्मॉल प्रॅटिनकोल, लिटल रिंग्ड प्लोवर, ग्रेट थिक नी, आणि स्मॉल टर्न - ५०-८० टक्के संख्येत घट 

● गवताळ प्रदेशातील ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लेसर फ्लॉरिकन यांच्या संख्येत लक्षणीय घट 

●पायाभूत सुविधांचा मोठ्या पक्ष्यांना फटका 

● उत्खनन, वृक्षतोड यांच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अधिवासाचा र्‍हास 

(संकलन-आयर्विन टाइम्स टीम)


(ट्रॅव्हल कॉर्नर) निसर्गाचा अप्रतिम आविष्कार: ठोसेघर धबधबा


ठोसेघर हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा आहे. पावसाचे आगमन होताच इथे पर्यटकांची गर्दी वाढत जाते. सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर असलेल्या या धबधब्याचा उगम सातारा शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वेघर इथे आहे. या नदीकाठी अनेक धबधबे असले, तरी ठोसेघर धबधबा नेहमी पर्यटकांना खेचून आणतो. 

 इथला सर्वांत लहान धबधबा २० मीटरचा, तर सर्वांत उंच धबधबा २१० मीटर आहे. इथे कोयना अभयारण्यात आढळणारे दुर्मीळ प्राणी, पक्षी, साप, कीटक आणि वनस्पतींच्या माहितीचे संग्रहालय आहे. हा धबधबा सुमारे १६०० फूट उंचीचा असून, भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. पावसाळ्यात धबधब्याच्या सभोवती रंगीबेरंगी फुलझाडे असतात. पाऊस अंगावर घेत, झोंबणाऱ्या वाऱ्यात निसर्गाचे रौद्ररूप काही पावलांवरून अनुभवण्याचा थरार पर्यटकांना वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातो. या धबधब्याचे एकूण तीन प्रवाह असून, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनखात्याचे दोन निरीक्षण मनोरे आहेत. एका पायवाटेने धबधलब्याच्या पायथ्याशीही जाता येते. ठोसेघरचा नयनरम्य धबधबा पाहण्यासाठीही प्रतिव्यक्ती पन्नास रुपये शुल्क मोजावे लागतात. अकरा वर्षावरील सर्वांना प्रवेश फी आहे. तेथे मोबाइल नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने ऑनलाइन पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे कॅश जवळ ठेवणे गरजेचे आहे. हा कर स्थानिक वनव्यवस्थापन समिती आकारते. दुर्घटना रोखण्यासाठी या समितीने धबधब्याजवळ स्वयंसेवकांची नियुक्‍ती केली आहे. मोठ्या धबधब्याकडे पायऱ्या उतरून आल्यावर तिथे सुरक्षित गॅलरी आहे. तेथून दरीच्या समोरील बाजूच्या डोंगराच्या भिंतींवरून कोसळणारा धबधबा, इंग्रजी 'यू' आकाराची दरी, दरीचा तळ. धबधब्याचा डोह, दरीच्या तळातील नदी हे मनोदृश्य दिसते. 

गुहेतील देवस्थान -मोठ्या धबधब्याजवळूनच लहान धबधब्याकडे जाण्याचा मार्ग आहे, लहान धबधब्याच्या वाहत्या धारेखाली मागच्या बाजूला एक गुहा असून, हे स्वयं जागत जागृत देवस्थान आहे. या गुहेतून पडणारा धबधबा पाहणे हा एक रोमांचक अनुभव आहे.

समर्थ रामदासांचे सज्जनगड- धबधब्याकडे जाताना शहरापासून 16 किलोमीटरवर सज्जनगड हे इतिहासप्रेमींचे आवडीचे ठिकाण आहे. गडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत गडावर जाता येते. दुपारी आणि सायंकाळी भक्‍तांना मोफत प्रसाद दिला जातो. जवळच चाळकेवाडीचा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. तोही पाहता येईल.

Wednesday, August 30, 2023

वेळेवर उपचार मिळावेत म्हणून एका मिनिटात रोग सांगणारे बनवले एआय उपकरण


तंत्रज्ञानाच्या या विश्वात 20 वर्षे घालवल्यानंतर, डॉ तथागतो राय यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असे उपकरण तयार केले आहे जे एका मिनिटात  माणसाला कोणता रोग  आहे हे ओळखते.  त्याला एआय 100 असे नाव देण्यात आले आहे.डॉ. राय सांगतात की त्यांचे बालपण विज्ञानाचे जग समजून घेण्यात गेले.  वडील इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. ४५ वर्षीय डॉ. राय यांनी आयआयटी खडगपूरमधून बीटेक आणि पीएचडी पूर्ण केली.  सन 2000 मध्ये एका अमेरिकन सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करायला सुरुवात केली. डॉ. राय यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तो तीव्र रक्ताचा कर्करोग यामुळे! वेळेत निदान ओळखता आले नाही, याची खंत त्यांना होती.  म्हणून त्यांनी इतर कोणाचा मृत्यू होणार नाही, यासाठी संशोधन केले आणि हे एआय 100 उपकरण विकसित केले. तपासात दिरंगाई होता कामा नये आणि वेळेवर उपचार केल्यास मानवी जीव वाचू शकतो, म्हणून हे यंत्र तयार करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मशीनमध्ये मायक्रोस्कोपिक लेन्स, एलईडी इल्युमिनेशन युनिट आणि कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड कॅमेरा वापरण्यात आला आहे. 

अशाप्रकारे काम करते मशीन- ते म्हणतात, सामान्यतः रक्त तपासणी यंत्र रक्ताच्या नमुन्याची चाचणी करते, परंतु ते रुग्णाच्या नमुन्याचे चित्र देखील वाचू शकते आणि रोगाबद्दल सांगू शकते. यात अशाप्रकारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा प्रकारे वापरले आहे की त्याचा स्वयंचलित स्लाइड स्कॅनर रुग्णाच्या नमुन्यांना प्रतिमांमध्ये रूपांतरित करतो आणि रोगाचे निदान करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करतो.


तबल्यावरच्या लय आणि तालच्या जोरावर केला विश्वविक्रम


That’s The Spirit

यंगिस्तान

मुंबईच्या तृप्तराजने लहानपणापासूनच तबला वादनाच्या आपल्या अनोख्या कौशल्याची ओळख जगाला करून दिली आहे.  त्यांनी 200 हून अधिक शो केले आहेत. 

नाव: तृप्तराज पंड्या

 वय: 16 वर्षे

 उपलब्धी: वयाच्या सहाव्या वर्षी सर्वात छोटा तबलावादक म्हणून गिनीज बुकमध्ये आपले नाव कोरले आहे. ग्लोबल चाइल्ड प्रॉडिजी अवॉर्ड, बाल कला रत्न पुरस्कार यासह अनेक सन्मान मिळाले आहेत. 2019 साठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला आहे. 

तृप्तराज यांनी वयाच्या दोन वर्षापासून तबला वाजवण्यास सुरुवात केली. वयाच्या दुसऱ्या वर्षी मुंबईतील सोमय्या कॉलेजमध्ये त्याचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याचा ऑल इंडिया रेडिओवर थेट तबलावादनाचा कार्यक्रम केला.  त्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षी त्याची प्रतिभा दूरदर्शनवर प्रसारित झाली. वयाच्या 6 व्या वर्षी त्याला सर्वात छोटा तबला विशारद (मास्टर) म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. यानंतर तो पुढे पुढे जात राहिला आणि आतापर्यंत त्याने 200 हून अधिक जाहीर कार्यक्रम केले आहेत.  तबला वाजवण्याबरोबरच त्याला बास्केटबॉल खेळायलाही आवडते.  तो त्याच्या शाळेच्या बास्केटबॉल संघाचा कर्णधार आहे.  त्याला इतिहास विषय फार आवडतो आणि मोकळ्या वेळेत विविध विषयांवरील माहितीपट बघायला आवडतात.

-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday, August 29, 2023

चालू घडामोडींवर एक दृष्टिक्षेप

1. 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे?

उत्तर- राष्ट्रीय अंतराळ दिवस

2. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर विक्रम लँडर उतरला ती जागा कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे?

उत्तर- शिवशक्ती पॉईंट

3.ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे?

उत्तर- राज्य क्रीडा दिवस

4.बुडापेस्ट येथे जागतिक अथलेस्टिक्स स्पर्धेत भालाफेकीत कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. 

उत्तर- नीरज चोप्रा

5. जागतिक अथलेस्टिक्स स्पर्धेत 88.17 मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकणारा आशियाई आणि पहिला भारतीय खेळाडू कोण?

उत्तर- नीरज चोप्रा

6.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या जून 2023 च्या अहवालानुसार  देशातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या किती झाली आहे?

उत्तर- 114.36 कोटी

7. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) किती टक्के आरक्षण देण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे?

उत्तर- 27 टक्के

8.71 वी मिस वर्ल्ड २0२३ ब्यूटी पेजेंट सोहळ्याचे आयोजन 8 डिसेंबर2023 रोजी  भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

उत्तर-काश्मीर

9. ब्रिक्स गटाची 15 वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जात आहे?

 (अ) ब्राझील (ब) भारत (स) चीन (द) दक्षिण आफ्रिका

उत्तर- दक्षिण आफ्रिका

10. बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय कोण?

 (अ) कृष्णन शशिकिरण (ब) निहाल सरीन (स) आर.  प्रगनानंद (द) पेंटला हरिकृष्ण

उत्तर- आर. प्रगनानंद

11. भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने कोणत्या मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे?

 (अ) शिक्षण मंत्रालय (ब) खाण मंत्रालय (स) नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (द) संरक्षण मंत्रालय

उत्तर- नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

12. 20 वी आसियान-भारत आर्थिक मंत्र्यांची बैठक कोठे झाली?

 (अ) मलेशिया (ब) भारत (स) इंडोनेशिया (द) थायलंड

उत्तर- इंडोनेशिया

13. फिफा महिला विश्वचषक 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?

 (अ) अर्जेंटिना (ब) ब्राझील (स) इंग्लंड (द) स्पेन

उत्तर- स्पेन 


तेजस्वी सूर्यपक्षी


आपल्याकडे पक्ष्यांच्या भरपूर जाती आणि प्रजाती आहेत. काही आपल्या देशातले आहेत तर काही बाहेरुन येतात. त्यापैकीच एक पक्षी म्हणजे सूर्यपक्षी. चिमणीपेक्षा लहान आकाराचा, लांब, वाकडी आणि अणकुचीदार चोच असलेला, फुलातील मध पिण्यासाठी इकडे-तिकडे उडय़ा मारत भूर्रकन उडणारा असा गडद, तेजस्वी, आकर्षक जांभळय़ा रंगाचा सूर्यपक्षी नेहमी आपल्या सभोवताली दिसून येतो. त्याच्या रंगाने तो आपल्याला नयनसुख आणि आवाजाने मंत्रमुग्ध करून दुहेरी आनंद देतो. फुलाच्या दांडीवर उलटे लटकून मध शोषताना तो दिसतो. त्याच्या घरटय़ाची आकर्षक बांधणी त्याच्यातील कलाकारीही दर्शवते. हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच मध भरलेल्या फुलांच्या शोधात निघतो. म्हणून त्याला सूर्यपक्षी व इंग्रजीमध्ये ‘सनबर्ड’ असे म्हटले जाते.

सूर्यपक्षी अतिशय सुंदर असा छोटा पक्षी आहे. त्याची लांबी सुमारे १० सेंमी असते. सूर्यपक्ष्याच्या मादीच्या पाठीचा, पंख, डोके आणि मानेचा रंग हिरवट तपकिरी असतो. शेपटी गडद तपकिरी, पोटाचा भाग पिवळसर असतो. पाय आणि चोच काळय़ा रंगाची असते. विणीच्या हंगामात म्हणजे साधारणपणे उन्हाळय़ात नराचे डोके, मान, संपूर्ण पाठ, गळा आणि छाती जांभळय़ा रंगाची असते आणि त्यावर निळय़ा, हिरव्या छटा दिसतात. पंख तपकिरी काळे, शेपटी निळसर काळी, पोटाकडची बाजू फिकट जांभळट काळी, पंखाखाली किरमिजी व पिवळय़ा पिसांचा एक झुपका असतो. एरवी नराचा रंग मादीच्या रंगासारखा असतो. मात्र, मानेपासून ते पोटापर्यंत जांभळय़ा रंगाचा पट्टा असतो. फुलांचा अचूक वेध घेत मध शोषण्यासाठी हे पक्षी सर्वत्र भटकत असतात. सूर्यपक्ष्याची जीभ लांब व बारीक नळीसारखी असून तिने तो सर्व प्रकारच्या फुलातील मध शोषून घेतो. तसेच फुलांवर असलेले कीटक व कोळी देखील खातो. सूर्यपक्षी काही अंशी हिमगबर्डसप्रमाणे फुलासमोर उडू शकतात. फक्त फुलांमधील मध खाताना ते फुलाच्या देठावर बसतात.

सूर्यपक्ष्याचा समावेश ‘नेक्टॅरिनिइडी’ या पक्षिकुलात होतो. सूर्यपक्ष्याच्या तीन ते चार प्रजाती देशात आढळतात. त्याबरोबरच पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार येथेही सूर्यपक्षी आढळून येतात. त्यास मराठीत शिंजीर, फुलचुखी, जांभळा सूर्यपक्षी, जांभळा शिंजीर, चुमका म्हटले जाते. इंग्रजीत सनबर्ड, पर्पल सनबर्ड नावाने ओळखले जाते. या पक्ष्याच्या सुमारे ९५ जाती असून बहुतेक जातींमधील नराचे रंग भडक व आकर्षक असतात. पानगळीचे जंगल, शेतीचा प्रदेश, माळराने, बागा, शेत, मळे, किनारी प्रदेश व झुडूपांमध्ये सूर्यपक्षी हमखास दिसून येतो. 

फांदीला लटकणारी घरटी बांधणे हे त्याचे आणखी वैशिष्टय़ असतात. घरटे बांधण्यासाठी सुरुवातीला सूर्यपक्षी सुरक्षित जागा शोधतात. त्यानंतर झाडे-झुडपे किंवा वेलींच्या पुढील फांदीच्या टोकाला किंवा घराच्या सभोवताली टांगलेल्या तारांना, दोऱ्यांना लटकलेली उभी लांबट आकाराची घरटे तयार करतात. जमिनीपासून खूप कमी उंचीवर ते घरटे बांधतात. सुकलेली पाने, बारीक काडय़ा, वाळलेले गवत, दोरा आणि कोळिष्टकांपासून घरटे तयार केले जाते. ते बाहेरून लाकडाचे लहानलहान तुकडे, किटकांच्या अंडय़ांचे आवरण किंवा सालीने झाकलेले असते. तसेच प्रवेशद्वार एका बाजूला करून त्याला सज्जा तयार केलेला असतो. त्यामुळे इतर पक्ष्यांपासून सूर्यपक्ष्यांच्या पिल्लांना कमी धोका असतो. मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते. नर फक्त तिच्या सुरक्षिततेसाठी लक्ष ठेऊन असतो. तसेच पिल्लांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात. मादी पांढरट, बदामी आणि त्यावर करडे-काळे ठिपके असलेली अंडी घालते. निसर्गचक्रामध्ये सूर्यपक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. फुलांमधील मध शोषताना या पक्ष्यांमार्फत फुलांचे परागीभवन होऊन चांगली फलधारणा होते. सूर्यपक्षाने शहरी जीवनाशी जुळवून घेतल्याने त्यांची संख्या स्थिर आहे. मात्र शहरी उद्यानात, घराजवळील भागात परदेशी शोभेची झाडे जास्त झाल्याने त्यांना अन्न मिळवणे अडचणी ठरते आहे. देशी फुलझाडे व वेलींची लागवड केल्यास या पक्षाचे मनमोहक सौंदर्य प्रत्येकाला न्याहाळता येईल. तसेच त्याची संख्याही अबाधित राहिल.

Sunday, August 20, 2023

फॉसा: साठ किलोमीटर वेगाने धावू शकतो


फॉसा हा मांजरासारखा वन्य प्राणी आहे. याची जवळीक मुंगूस कुटुंबाशी अधिक आहे. हे मुख्यतः मादागास्करच्या उष्णकटिबंधीय वर्षा वनांमध्ये आढळतात. फॉसा ही लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहे.  सध्या 2500 पेक्षा कमी फॉसा जंगलात शिल्लक आहेत.फॉसाचा रंग काळा, तपकिरी, लाल असतो तसेच शरीर लांब-सडपातळ असते. याला गोल कान, मोठे डोळे आणि लांब मिशा असतात. यांची लांबी सुमारे 2 मीटर असू शकते, परंतु बहुतेकांची लांबी 24 ते 34 इंच दरम्यान असते. यांचे वजन 15 किलो पर्यंत असते. नर मादीपेक्षा मोठे असतात.  फॉसा हा एक निशाचर प्राणी आहे, परंतु अन्न स्रोत कमी असेल तर मग दिवसाही शिकार करतात. फॉसा मांसाहारी आहेत.  हे लहान सस्तन प्राणी, पक्षी, मासे, सरडे आणि बेडूक यांची शिकार करतात. याच्या पंजावर धारदार नखे असतात, ज्याचा उपयोग शिकारीसाठी केला जातो. हा वन्य प्राणी ताशी 60 किलोमीटर वेगाने धावू शकतो. फॉसामध्ये मोठ्या प्रमाणात श्रवण, वास आणि दृष्टी क्षमता खूपच अधिक असते. फॉसा हा अतिशय चपळ प्राणी आहे. तो आपला बहुतेक वेळ झाडांवर, फांद्यावर लटकण्यात किंवा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारण्यात घालवतो. शरीराचा समतोल राखण्यासाठी त्याला त्याच्या शेपटीचा उपयोग होतो.मादी एकावेळी दोन ते चार पिलांना जन्म देते.  तरुण फॉसा 12 आठवड्यांचे झाल्यानंतर बाहेरचे खाण्यास सुरवात करतात. फॉसा 4 वर्षांनी पूर्णपणे परिपक्व होतो.  ते बंदिवासात 20 वर्षांपर्यंत जगू शकतात.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, August 19, 2023

देशातील एकमेव पुरुष नदी ब्रह्मपुत्र


आपल्या देशात नद्यांना मातेचा दर्जा देऊन त्यांची पूजा केली जाते.जसे की गंगा नदीला सर्वात पवित्र नदी म्हटले जाते आणि या नदीची माता म्हणून पूजा केली जाते. याशिवाय यमुना, कृष्णा, कावेरी, नर्मदा या नद्याही लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक अशी नदी आहे जिला पुरुष नदीचा दर्जा देण्यात आला आहे? ही नदी केवळ हिंदू धर्मातच नाही तर इतर दोन धर्मातही पूजनीय मानली जाते.  त्या नदीचे नाव ब्रह्मपुत्र नदी आहे. 

असा मिळाला नदीचा दर्जा: ब्रह्मपुत्र ही अशी एकमेव नदी आहे, जिची पुरुषरूपात पूजा केली जाते.वास्तविक, सनातन धर्मानुसार ब्रह्मपुत्र नदीला ब्रह्मदेवाचे पुत्र मानले जाते.म्हणूनच पौराणिक काळापासून या नदीला पुरुषरूपात मानले जाते. 

श्रद्धा अनेक धर्मांशी निगडीत: सनातन धर्म मानणाऱ्या लोकांची ब्रह्मपुत्र नदीवर धार्मिक श्रद्धा आहे. ही नदी बौद्ध आणि जैन धर्माच्या अनुयायांमध्येही श्रद्धेचे प्रतीक आहे.दरवर्षी जून महिन्यात ब्रह्मपुत्र नदीचे पाणी तीन दिवस रक्तासारखे लाल होते. यामागे एक धार्मिक श्रद्धा आहे की या काळात कामाख्या देवी मासिक चक्रात वास्तव्य करते. रजस्वलाच्या काळात संपूर्ण ब्रह्मपुत्रा नदी कामाख्या देवीच्या वाहत्या रक्ताने लाल होते. 

बौद्ध धर्माची श्रद्धा: बौद्ध धर्मानुसार ब्रह्मपुत्र नदी पूर्वी एक विशाल सरोवर असायची. पण या सरोवराचे पाणी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रहिवाशांनाही आवश्यक आहे, हे एका दयाळू व्यक्तीच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी या सरोवरातील पाणी वाहते करण्यासाठी त्याने  मार्ग तयार केला, ज्यामुळे ही नदी निर्माण झाली आणि नंतर ती ब्रह्मपुत्र नदी म्हणून ओळखली जाऊ लागली.

उगम स्थळ: ब्रह्मपुत्र नदीचा उगम तिबेटमधील पुरंग जिल्ह्यातील मानसरोवर सरोवराजवळ होतो. कैलास पर्वताच्या खाली 5,100 मीटर उंचीवर असलेल्या हिमनदी (ग्लेशियर) पासून ती उगम पावते. सिंधू आणि सतलज या नद्यादेखील या उगमापासून काही अंतरावर उगम पावतात. येथून निघाल्यानंतर ही नदी भारत आणि बांगलादेशमधूनही वाहते.त्याचबरोबर बौद्ध धर्माच्या लोकांच्या समजुतीनुसार ही नदी चांग थांग पठारावरून उगम पावते. ब्रह्मपुत्र नदीची एकूण लांबी 2,900 किमी आहे. ती भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये गणली जाते परंतु तिला सर्वात लांब नदीची मान्यता मिळाली नाही कारण आपल्या देशात तिची लांबी फक्त 916 किमी आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी  नावे: ब्रह्मपुत्र नदी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते.अरुणाचल प्रदेशात सियांग/दिहांग या नावाने तर आसाममध्ये ही नदी ब्रह्मपुत्र आणि लोहित नदी म्हणून ओळखली जाते.शेजारच्या तिबेटमध्ये या नदीला यार्लुंग त्सांगपो म्हणतात.  आणखी एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की बांगलादेशात पोहोचल्यानंतर या नदीचे नाव जमुना झाले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Monday, August 7, 2023

घुमट: एक सांस्कृतिक वाद्य


घुमट या नावातूनच अर्थबोध आणि नादबोध होतो. ज्याचा आवाज घुमतो ते घुमट. त्याचा गोल घुमटाकार - (Dome) - म्हणून घुमट. घुमट हे मातीचे गोलाकार भांडे असते. त्याची एक बाजू लहान तर दुसरी मोठी असते. लहान तोंड मोकळे ठेवले जाते आणि मोठ्या तोंडावर घोरपडीची कातडी ताणून काथ्याने घट्ट बांधली जाते. दोन्ही तोंडांच्या गळ्याला काथ्याची दोरी बांधून घुमट गळ्यात अडकविले जाते किंवा ते कंबरेला बांधून अथवा खुर्चीवर बसून दोन्ही मांड्यांमध्ये धरून वाजविले जाते.

वाजंत्री आपल्या उजव्या हाताने घुमटाच्या मोठ्या (कातडी) तोंडावर थाप मारतो आणि त्या ठेक्याला धरून लहान (मोकळ्या) तोंडावर हाताने उघडझाप करतो तसेच दोन्ही हातांनी ते तबल्यासारखे वाजविता येते. कसबी 'घुमटनवाज' घुमटावर लयबद्धपणे ठेका धरतो आणि त्याची गती वाढवत जातो. वसई भागात लग्नात हे वाद्य वाजवले जाते. लग्नात तो नाद ऐकून वऱ्हाडी मंडळीच्या नसानसांतून रक्त धावू लागते.
गोव्यात अगदी आठव्या शतकापासून घुमटाचा वापर केला जात आहे. तेथील मंदिरांतून तसेच सांस्कृतिक कार्यप्रसंगी हे लोकवाद्य वाजविले जाते. घुमट हे प्रामुख्याने गोवा, कोकणातून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांत म्हणजेच कर्नाटक, वसईपर्यंत पोहोचले आहे. वसईत ते पोर्तुगीजांनी आणले असावे असा कयास आहे. कोकणात गणेशोत्सव तसंच शिमग्यात त्याचा वापर आजही होतो. आंध्र प्रदेशातही घुमटाचा वापर होतो. तिथे त्याला 'गुमेटा' असे म्हणतात.
प्रारंभीच्या काळात मागासवर्गीय लोकांचे हे वाद्य होते. घुमटाला घोरपडीचे कातडे लावले जात असल्याने उच्चवर्णीय लोक त्याला स्पर्श करीत नसत. १९७२च्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये घोरपडीला दुर्मीळ व संरक्षित प्राणी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे घुमट या वाद्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याला पर्याय म्हणून आता शेळीच्या कातड्याचा वापर करण्यात येऊ लागला आहे.
घुमट वादकांच्या मते, घोरपडीच्या कातड्याचा चिवटपणा आणि या कातड्यामुळे जो नाद घुमतो, तो नादप्रभाव अन्य प्राण्यांच्या कातड्यापासून उत्पन्न होत नाही. वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिकंपने हा घोरपडीच्या कातड्याचा विशेष मानला जातो. अन्य प्राण्यांची कातडी ढिली पडत असल्यामुळे घुमट वाजविण्यापूर्वी चुलीतील विस्तवाजवळ शेकवले जाते. त्या धगीने कातड्याची ढिलाई जाऊन ते किंचित ताणले जाते.
गोव्यात या वाद्याला 'वारसा दर्जा' देणार आहेत. काही अटीची पूर्तता झाल्यावर असा दर्जा मिळेल आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतून अधिकृत वाद्य म्हणून घुमट वाजविता येईल. वसईतील प्रसिद्ध घुमटवादक विल्यम डिमेलो म्हणतात की, हे वाद्य कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण करीत नाही. पोर्तुगीज काळापासून हा संगीत वारसा येथे जपला जात असून ख्रिश्चनांबरोबरच गणेशोत्सव, होळी, दहीकाला अशा उत्सवप्रसंगी हिंदू बांधवसुद्धा घुमट वापरतात. एका घुमटाची किंमत ७००-८०० रुपयांपर्यंत असते. त्यासाठी लागणारी मडकी कुंभाराकडून खास बनवून घेतली जातात. वसईत युवक-युवतीचा “घुमटगँग' नावाचा वाद्यमेळ असून घुमटाच्या ठेक्यावर ते पारंपरिक लोकगीतांचे संगीत जलसे जल्लोषात साजरे करतात.

Saturday, August 5, 2023

अत्यंत दुर्मिळ उंदीर हरीण


निसर्गातील एक आश्चर्यकारक प्राणी म्हणजे उंदीर हरीण. म्हणजेच माउस डियर. तसेच मराठीत त्याला 'मृषक हरिण', 'पिसोरी हरिण', 'पिसुरी हरिण' म्हणून संबोधले जाते. पिसोरी हरिण हा  लाजरा व कायम मनुष्यवस्तीपासून  दूर जंगलात राहणारा वन्यजीव आहे. वेळप्रसंगी खूप चपळतेने हे हरिण पळते. आपल्या देशात आढळणाऱ्या 12 प्रजातींपैकी उंदीर हरीण देखील त्यांपैकी एक आहे.हे जगातील सर्वात लहान हरीण मानले जाते.  नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलेल्या या प्राण्यामध्ये उंदीर, ससा आणि हरणांची वैशिष्ट्ये दिसून येतात. प्रत्येक हरिणाची  शरीररचना वेगवेगळया असतात.  त्याचप्रमाणे पिसोरी हरिणाच्या मुखाची रचना उंदरासारखी असून  डोके लहान, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात पिसोरी हरिणाच्या दोन जाती आहेत. आशियायी पिसोरी हरिण आणि आफ्रिकी पिसोरी हरिण. देशात पिसोरी हरिण दाट जंगलापासून सामान्यतः १,८५० मी. उंचीपर्यत आढळते. दाट झाडी आणि आर्द्र वनक्षेत्र परिसरात निवास करतात.  हे  हरीण मुख्यतः जास्त पाऊस असलेल्या भागात आढळते.  भारत, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यासह इतर दक्षिण आशियाई आणि पूर्व आशियाई देशांच्या उष्णकटिबंधीय आर्द्र भागात आढळतात. पिसूरी हरीण हे युग्मखुरी वर्गात गणल्या जाणाऱ्या  त्रागुलिडी  कुळातील प्राणी असून आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत  आढळतात.  यांची खांद्यापर्यंतची उंची साधारण २५ ते ३० सेमी असते. भारतीय पिसोरी हरणाच्या शरीराची लांबी ४५-५५ सेंमी असते. या हरिणाचे वजन ०.७ ग्रेंम ते ८ किलोग्रेंमपर्यत असते. पाय अतिशय सडपातळ व मागचा भाग उंच असतो. तसेच प्रत्येक पायावर चांगली वाढ झालेली चार बोटे असतात. शरीरावर लहान, मुलायम आणि दाट केस असतात. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते. डोक्यावर आणि खालच्या भागावर ते जास्त आखूड केस असतात, शरीराचा रंग तपकिरी असून त्यावर पिवळसर ठिपके आणि फिकट पिवळे पट्टे असतात. हा प्राणी जंगलात आठ ते बारा वर्षे जगू शकतो. 

पिसोरीच्या शरीराचा खालचा भाग, पोट इतर हरिणांप्रमाणे पांढरे व पिवळे असते. यांना शिंगे नसतात. पोटाची बाजु पांढरी असते. गळयावर तीन पांढरे पट्टे असतात. हा लहान, बुजऱ्या स्वभावाचा आणि परिसरात चटकन मिसळण्याच्या रंगसंगतीचा प्राणी असल्यामुळे सहज दिसून येत नाही. हे हरिण रवंथ करणारे आहे. त्याचे जठर रवंथ करणाऱ्या इतर प्राण्यांप्रमाणे चार कोष्ठांचे बनलेले असते. वनस्पतीजन्य पदार्थ, अगदी कठीण पदार्थही त्यांच्या पोटात आंबवले जातात. मात्र, यातील एक कोष्ठ विकसित झालेले नसल्याने तीनच कोष्ठ असतात. 

मादी हरणांचा प्रजनन कालावधी संपूर्ण वर्षभर असतो.  मादी वर्षातून दोनदा जन्म देते.  हे सहसा एका वेळी फक्त एकाच पिलाला जन्म देते, परंतु अपवाद म्हटले तर दोन पिलांना जन्म देऊ शकते.  नवजात बाळ जन्मानंतर केवळ 24 तासांच चालायला आणि धावयाला  सुरू करतात.

खडकाळ व गवताने झाकलेल्या डोंगरांच्या बाजू किंवा दाट जंगल यात हा प्राणी नेहमी आसरा घेतो. खडकातील कपारी अथवा मोठाले दगडधोंडे यात तो लपून बसतो. पिसोरी हरिण फार भित्रे असते. दिवस उजडण्याच्या वेळी किवा सायंकाळन॑तर ते अन्न मिळविण्याकरिता बाहेर पडते. परंतू फार दूर मोकळ्या जागी जाण्याचे ते धाडस करीत नाही. धोक्याचा संशय आल्यास एखाद्या कपारित लपते. गवत, झुडपांचा पाला, कोवळी रोपे, गळून पडलेली रानफुले हे या प्राण्यांचे अन्न आहे. हे हरिण अतिशय दुर्मीळ असल्याने तिचे संवर्धन आणि संरक्षणाकडे विशेष लक्ष्य देण्यात येत आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


Thursday, August 3, 2023

साबण वापरणं का गरजेचं? दूध वारंवार तापवावं का लागतं?

 साबण वापरणं का गरजेचं? 

रोज व्यवस्थित साबण वापरून स्नान करायला आपल्याला सांगितलं जातं. हा साबण नक्की करतो काय? आपल्या त्वचेवर तैलग्रंथींमधून विविध प्रकारची तैलयुक्त द्रव्यं पसरलेली असतात. आपण जेव्हा बाहेर फिरतो, तेव्हा धुळीचे कण या द्रव्यांत मिसळतात आणि त्यातून होणारी घाण ही सूक्ष्मजंतूंच्या वाढीसाठी पोषक असते. याचबरोबर तापमान कमी करण्यासाठी त्वचेवर घामसुद्धा पसरलेला असतो. तोही या घाणीत मिसळतो आणि सूक्ष्मजंतू प्रक्रिया करायला लागतात आणि विचित्र वास येणं, खाजणं अशा गोष्टी व्हायला लागतात. साबणातले घटक या तैलयुक्त घटकांना शरीरापासून दूर करायला मदत करतात. घामाच्या घटकांशीही ते प्रक्रिया करतात आणि पाण्याबरोबर वाहून जायला मदत करतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते. अनेक साबणांत जीवाणूविरोधी गुणधर्मही असतात. त्यांचाही शरीराच्या स्वच्छतेसाठी उपयोग होतो. बहुतेक साबणांमध्ये अतिशय सुवासिक अशी द्रव्यं मिसळलेळी असतात. त्यामुळे आपल्या चित्तवृत्ती उल्हसित होतात. 

दूध वारंवार तापवावं का लागतं? 

दोस्तहो, आपल्या घरात दूध असतं. रेफ्रिजरेटर असला, तर त्यामध्ये ठेवा असं आई आपल्याला नेहमी सांगत असते आणि बाहेर असलं, तर तापवून ठेवा असंही सांगते. जर तापवून ठेवलं नाही तर दूध नासतंच. दूध ठराविक तासांनी तापवायला का लागतं? मित्र मैत्रिणींनो, दूध मुळात नासतं कशामुळे हे आपण बघू या. दुधात लॅक्टोज नावाची एक साखर असते. आपल्या अवतीभवती, दुधात काही जीवाणू असतात.ते या लॅक्टोज नावाच्या साखरेचं विघटन करून तिचं लॅक्टिक अँसिड नावाच्या रसायनात रूपांतर करतात. म्हणजेच थोडक्यात दूध नासतं. आपण दूध फ्रीजमध्ये ठेवतो, तेव्हा तिथलं वातावरण थंड असतं. थंड वातावरणात हे जीवाणू विघटनाची प्रक्रिया फार करू शकत नाहीत कारण त्यांना विशिष्ट तापमान लागतं. बाहेर मात्र ते कार्यान्वित असतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल, की दूध लवकर नासतं कारण ते तापमान या जीवाणूंना पोषक असतं. आपण दूध तापवतो, तेव्हा थोडक्यात त्याचं तापमान वाढवतो. हे  तापमान आपण इतकं वाढवतो, की त्या तापमानाला ते जीवाणू मरून जातात. त्यामुळे त्यांना लॅक्‍टोजचं विघटन करण्याची संधीच मिळत नाही. थोड्या वेळानं मात्र हवेतले इतर जीवाणू पुन्हा दुधात जातात आणि ते पुन्हा ही प्रक्रिया करू शकतात. अशा वेळी दूध पुन्हा तापवावं लागतं. 


शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...