खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी येतात. खोकड हा प्राणी कोकरी, लोमडी, छोटा कोल्हा व इंडियन फॉक्स अशाही नावांनी ओळखला जातो. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत तो सर्वत्र आढळतो. प्रामुख्याने माळरानावर, खुरट्या झुडपांच्या वनात, शेतात, कालव्यांच्या आसपास त्यांचे अस्तित्व असते. भारतात सर्वत्र आढळणार्या खोकडाचे शास्त्रीय नाव व्हल्पिस बेंगॉलेन्सिस आहे. सडपातळ आणि लांब झुपकेदार शेपटीमुळे खोकड सहज ओळखता येते.
खोकड हा कोल्ह्यापेक्षा आकाराने लहान असतो. त्याच्या शरीराची लांबी डोक्यासकट ४५ ते ६० सेंमी. असते. शेपूट २५ ते ३५ सेंमी. लांब असते. वजन १.५ ते ७ किग्रॅ. असते. खोकड आकाराने लहान व सडपातळ असून पाय बारीक आणि लांबट असतात. शरीराचा रंग करडा किंवा राखाडी असतो. डोके, मान आणि कानामागची बाजू पुसट काळसर तर शेपटीचे टोक काळे असते. पायांचा रंग मातकट लालसर असतो. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट केस येतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते.
खोकड जमिनीमध्ये ६०-९० सेंमी. खोलीवर बिळे खोदतात. बिळाला जमिनीच्या दिशेनी ३-४ वाटा असतात. संकटकाळी या वाटांचा त्याला उपयोग होतो. बिळ लांबलचक असून त्यात बरीच जागा असते. दिवसा उन्हाच्या वेळी ते या जागी आराम करतात आणि संध्याकाळी भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. अंधार दाटून आल्यानंतर कोल्ह्याप्रमाणे तेही एकत्र जमून सारखेच ओरडतात. त्यांचे प्रमुख खाद्य उंदीर, घुशी, सरपटणारे प्राणी, खेकडे, कीटक इ. असते. कलिंगडे, बोरे, हरभर्याचे घाटेदेखील ते खातात. हा प्राणी मनुष्य वस्तीच्या आसपास राहणारा असला तरी कोंबड्या वगैरे पळवीत नाही. उलट तो उंदीर, घुशी, शेतातील खेकडे खात असतो; त्यामुळे अशा प्राण्यांच्या उपद्रवापासून शेतीचे रक्षण होऊन शेतकर्यांना मदतच होते.
जैवविविधता साखळीत त्यांचे मोलाचे योगदान असून, धोकादायक प्रजातींमध्ये त्यांचा समावेश आहे. हे जमिनीत, बांधावर किंवा लहानशा टेकडावर बिळ करून राहतात. हिवाळा हा त्यांच्या प्रजोत्पादनाचा मुख्य काळ असतो. मादीला दर खेपेस चार पिल्ले होतात.
सरपटणारे प्राणी, लहान सस्तन प्राणी, कीटक, बोर आणि पक्षी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे, तसेच खोकड हा उंदीर, घुशी, शेतातील किडे खात असतो, पावसाळ्यात पांढया मुंग्या आणि वाळवीदेखील खातो. खोकडाचे भक्ष्य असणाऱ्या उपद्रवी प्राण्यांपासून शेतीचे रक्षण होऊन शेतकर्यांना मदतच होते, शेतक-यांचा मित्र असणार्या खोकडांना गरज आहे.

No comments:
Post a Comment