Friday, March 17, 2023

वयाच्या 60 व्या वर्षी लावला शोध! मुलीची जुनी सायकल सौरऊर्जेवर चालणाऱ्या 'ईव्ही'मध्ये बदलली


पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे हा प्रत्येकासाठी चांगला पर्याय बनला आहे. पण सामान्य माणसासाठी इलेक्ट्रिक वाहन विकत घेणे आव्हानात्मक आहे. त्याच्या उच्च किमतीपासून चार्जिंगपर्यंत अनेक समस्या असल्यामुळे अजूनही लोकांना EV वापरणं कठीण होऊन बसलं आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या 60 वर्षीय चंदन बिस्वास यांनी त्यांच्या कार्यालयात ये-जा करण्याच्या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. आणि त्यांनी त्यांच्या गावात बनवलेल्या सोलर सायकलमुळे ते  प्रसिद्धीलाही आले.

एका मुलाखतीत श्री. चंदन सांगतात की, “मी कुठेही सायकल घेऊन बाहेर जातो, तेव्हा लोक थांबवून विचारतात. फुकटात सहज चालवता येईल, अशी सायकल घ्यावी, असे गावातल्या अनेकांना वाटते.पण त्याच्या चढ्या किमतीमुळे प्रत्येकजण ते विकत घेऊ शकत नाही.” चंदन त्याच्या घरापासून ऑफिस आणि ऑफिस ते घर असा 24 किमीचा प्रवास स्वतःच्या सौर सायकलवरून करतात. चंदन यांचे ऑफिस त्यांच्या घरापासून 10 किमी अंतरावर करीमपूरमध्ये आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी चंदन घरापासून एक किमी दूर असलेल्या बसस्थानकावर जायचे आणि त्यानंतर तेथून बसने ऑफिसला जायचे. त्यांना नेहमी वाटायचं की, आपण एखादी स्कूटर खरेदी करावी, पण ते शक्य नव्हते. आर्थिक अडचणीमुळे आणि पेट्रोलच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती यांमुळे त्यांना शेवटी बसनेच ऑफिसला जाणं भाग होऊ लागलं. तीन वर्षांपूर्वी, जेव्हा सर्वजण इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलू लागले तेव्हा चंदन यांना इलेक्ट्रिक वाहन वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय आहे असं वाटू लागलं.  

आता कोठून मिळवायचे, कसे चार्ज करायचे?  असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. मग त्यांनी घरी काही प्रयोग करायला सुरुवात केली आणि आपल्या मुलीच्या जुन्या सायकलचे इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. एक मोटार आणि लिथियम आयरन बॅटरीच्या सहाय्याने त्यांनी त्या सायकलचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर केले. चार्ज केलेल्या बॅटरीच्या साहाय्याने ही सायकल सुरळीत धावू लागली. पण कधी कधी लांबचा प्रवास करावा लागल्यास बॅटरी चार्ज करणे अवघड होऊन जात असे. चंदन सांगतात की, “लांबच्या प्रवासात इलेक्ट्रिक सायकलचा चार्ज कधी कधी संपत असे.  त्यामुळे मला वाटलं की याला सोलर पॅनल का लावू नये!”  

मग चंदनने त्याच्या सायकलला 24/165W सोलर पॅनल बसवले. त्यांनी सोलर पॅनल पाच हजारांना आणि बॅटरी सुमारे नऊ हजारांना विकत घेतली. यासोबतच त्यांनी त्यात एक किटही ठेवले आहे. त्यांनी आपल्या सायकलला सोलर पॅनल अशा प्रकारे बसवले आहे की त्यामुळे प्रवासात सूर्यापासून त्यांचे संरक्षण करण्याचे कामही करते. या पॅनेलमुळे त्यांच्या सायकलचे रूपच पालटले आहे. जेव्हा ते पेडल न मारता लेडीज सायकल चालवतात तेव्हा लोक त्यांच्याकडे आणि त्यांच्या सायकलकडे बघतच राहतात.  ही सायकल बनवण्यासाठी तब्बल 19 हजारांचा खर्च आल्याचे चंदन सांगतात, तर बाजारात दुप्पट किमतीतही ही सायकल  उपलब्ध नाही.

खरे तर चंदन अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील घरप्रपंच चालवण्यासाठी गावोगावी जाऊन कीर्तन करायचे. लहानपणापासूनच चंदन यांना विज्ञानात खूप आवड होती.  मात्र बारावीपर्यंत सायन्सचे शिक्षण घेतल्यानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांना कला शाखेतून पदवी घ्यावी लागली. मात्र, त्यांचं मन सतत काहीतरी बनवण्यात किंवा एखाद्या यंत्रांमध्ये मग्न असायचे. छंद म्हणून त्यांनी काही काळ रेडिओ आणि टीव्ही मेकॅनिक म्हणूनही काम केले. पण कॉपी रायटरची नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी ते काम सोडले. 


चंदन सांगतात की, मला मशीन्समध्ये रुची आहे आणि मला अशा प्रकारची कामं करायला आवडतात. इलेक्ट्रिक सोलर सायकल बनवतानाही मी रोज ऑफिसमधून घरी आल्यावर काम करायचो. अशा प्रकारे मी दोन महिन्यांत सोलर सायकल तयार केली. चंदन अजून या एका शोधाने थांबणार नाहीत तर येणाऱ्या काळात हवेतील लहरींच्या व्होल्टेजचा वापर करून काहीतरी बनवण्याचा विचार करत आहे.चंदन यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून आपले जीवन सुसह्य केले आहे ते खरे तर आश्चर्यकारक आहे, असे म्हणावे लागेल.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...