महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यात त्याच नावाचा हा किल्ला आहे. खर तर भुदरगड किल्ल्याचेच नाव या तालुक्याला दिले आहे असे म्हणावे लागेल. कारण भुदरगड नावाचे कोणतेही गाव या तालुक्यात नाही. गारगोटी हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून सर्व प्रशासकीय कामे गारगोटी शहरातूनच चालतात. गारगोटी पासून फक्त १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे यातील बहुतांशी किल्ले हे उंचीने थोडके आहेत, पण माथ्यावर बऱ्यापैकी सपाट असल्याने दुर्गस्थापत्यकारांनी संरक्षणाच्या दृष्टीने येथे चौफेर बांधकामे केली आहेत. किल्ले भूदरगड हा या किल्ल्यांपैकीच एक. किल्ले भूदरगडाला भेट देण्यासाठी आपणास कोल्हापूर गारगोटी पेठ शिवापूर ते भूदरगड असा प्रवास करावा लागतो. गडमाथ्यावर थेट गाडी जाऊ शकत असल्याने सर्ज आबालवृद्ध या गडाला भेट देऊ शकतात. गाडी रस्त्याने आपण थेट गडीवरील भैरवनाथाच्या मंदिराजजळ येऊन पोहोचतो. भैरवनाथाचे हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. मंदिरासमोरच दीपमाळ, ध्वजस्तंभाचा बुरूज व एका चौथऱ्यावर तोफ मांडून ठेवलेली आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारी ही तोफ पाहून आपण मंदिराच्या बाजूलाच असणाऱ्या अजून दोन दीपमाळा व समाधीचा चौथरा पाहून घ्यायचा. मंदिरासमोरून जाणार्या वाटेने पुढे आपणास एक प्रशस्त सदर करवीरकर छत्रपतींनी बांधलेले पुरातन शिवमंदिर दिसून येते. हे सर्व अवशेष पाहून पुढे गेल्यावर
दूधसागर तलावाजवळ येऊन पोहोचतो. तलावाशेजारी भवानी मातेचे सद्यस्थितीत भग्नावस्थेत असलेले मंदिर आहे. पुढे दूधसागर तलावाच्या काठावर असलेले महादेवाचे एक प्रेक्षणीय मंदिर आपले लक्ष वेधून घेते. या महादेव मंदिराच्या बाजूलाच अजून एक छोटे मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे पाहून आपण गडाच्या पूर्वेकडील तटबंदीकडे वाटचाल करायची. या बाजूस गडपायथ्याच्या जखीनपेठ गावाकडे उतरणारी वाट आहे. आपण थोडी वाट वाकडी करून जखीनपेठ गावाकडे जाणाऱ्या या वाटेकडे मार्गस्थ व्हायचे. काही वेळातच गडउतारावर एक महाकाय जांभ्या दगडाची शिळा आपले लक्ष वेधून घेते. या शिळेच्या जवळ जाऊन पाहिले, तर ही शिळा आतून पूर्णपणे कोरल्याचे आपणास दिसून येते. या शिळेला स्थानिक लोक “पोखरधोंडी' नावाने ओळखतात. हा आगळावेगळा दगड पाहून आपण आल्या वाटेने परत माघारी गडमाथ्यावर यायचे. पुढे तटफेरी करताना पूर्वेकडील तटावर आपणास एक नंदीची मूर्ती दिसून येते. या मूर्तीच्या समोरच जमिनीच्या पोटात एक गुप्त दरवाजा आहे. कातळकोरीव पायऱ्यांनी या दरवाजातून खाली उतरल्यावर जमिनीच्या पोटात आपणास एक भुयार दिसते. हे कातळकोरीव भुयार जखुबाईचे गुहामंदिर म्हणून ओळखले जाते. गडावरील हे वैशिष्ट्यपूर्ण गुहामंदिर पाहून आपण आता गडाच्या पश्चिम तटाकडे वाटचाल करायची. भूदरगडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाची बहुतांशी तटबंदी आजही खणखणीत व सुस्थितीत आहे.
शिलाहारांच्या विविध शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे घराणे मानले जाते. या घराण्याने इसवी सन ९४० ते १२१२ या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण १६ राजे सिंहासनावर बसले त्यामधील शेवटचा राजा भोज (दुसरा) हा होता. त्याने ११७५ ते १२१२ या काळात राज्य केले आणि जवळ जवळ १५ किल्ले बांधले. सध्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्हयातील पन्हाळगड, भुदरगड, विशाळगड, गगनगड, रांगणा, अजिंक्यतारा असे अनेक महत्वाचे किल्ले बांधण्याचे श्रेय या राजाकडेच जाते. भूदरगडाच्या निर्मितीचे श्रेय शिलाहार भोज राजा दुसरा याला जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी भूदरगड किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याची डागडुजी केली. छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून स्वराज्यात परत येताना भूदरगडावर थांबल्याची नोंद आहे. इंग्रजांनी भूदरगड जिंकताच गडाचा महादरवाजा व तटबंदीचा काही भाग पाडून टाकला.
No comments:
Post a Comment