Monday, August 7, 2023

घुमट: एक सांस्कृतिक वाद्य


घुमट या नावातूनच अर्थबोध आणि नादबोध होतो. ज्याचा आवाज घुमतो ते घुमट. त्याचा गोल घुमटाकार - (Dome) - म्हणून घुमट. घुमट हे मातीचे गोलाकार भांडे असते. त्याची एक बाजू लहान तर दुसरी मोठी असते. लहान तोंड मोकळे ठेवले जाते आणि मोठ्या तोंडावर घोरपडीची कातडी ताणून काथ्याने घट्ट बांधली जाते. दोन्ही तोंडांच्या गळ्याला काथ्याची दोरी बांधून घुमट गळ्यात अडकविले जाते किंवा ते कंबरेला बांधून अथवा खुर्चीवर बसून दोन्ही मांड्यांमध्ये धरून वाजविले जाते.

वाजंत्री आपल्या उजव्या हाताने घुमटाच्या मोठ्या (कातडी) तोंडावर थाप मारतो आणि त्या ठेक्याला धरून लहान (मोकळ्या) तोंडावर हाताने उघडझाप करतो तसेच दोन्ही हातांनी ते तबल्यासारखे वाजविता येते. कसबी 'घुमटनवाज' घुमटावर लयबद्धपणे ठेका धरतो आणि त्याची गती वाढवत जातो. वसई भागात लग्नात हे वाद्य वाजवले जाते. लग्नात तो नाद ऐकून वऱ्हाडी मंडळीच्या नसानसांतून रक्त धावू लागते.
गोव्यात अगदी आठव्या शतकापासून घुमटाचा वापर केला जात आहे. तेथील मंदिरांतून तसेच सांस्कृतिक कार्यप्रसंगी हे लोकवाद्य वाजविले जाते. घुमट हे प्रामुख्याने गोवा, कोकणातून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांत म्हणजेच कर्नाटक, वसईपर्यंत पोहोचले आहे. वसईत ते पोर्तुगीजांनी आणले असावे असा कयास आहे. कोकणात गणेशोत्सव तसंच शिमग्यात त्याचा वापर आजही होतो. आंध्र प्रदेशातही घुमटाचा वापर होतो. तिथे त्याला 'गुमेटा' असे म्हणतात.
प्रारंभीच्या काळात मागासवर्गीय लोकांचे हे वाद्य होते. घुमटाला घोरपडीचे कातडे लावले जात असल्याने उच्चवर्णीय लोक त्याला स्पर्श करीत नसत. १९७२च्या भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये घोरपडीला दुर्मीळ व संरक्षित प्राणी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे घुमट या वाद्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याला पर्याय म्हणून आता शेळीच्या कातड्याचा वापर करण्यात येऊ लागला आहे.
घुमट वादकांच्या मते, घोरपडीच्या कातड्याचा चिवटपणा आणि या कातड्यामुळे जो नाद घुमतो, तो नादप्रभाव अन्य प्राण्यांच्या कातड्यापासून उत्पन्न होत नाही. वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिकंपने हा घोरपडीच्या कातड्याचा विशेष मानला जातो. अन्य प्राण्यांची कातडी ढिली पडत असल्यामुळे घुमट वाजविण्यापूर्वी चुलीतील विस्तवाजवळ शेकवले जाते. त्या धगीने कातड्याची ढिलाई जाऊन ते किंचित ताणले जाते.
गोव्यात या वाद्याला 'वारसा दर्जा' देणार आहेत. काही अटीची पूर्तता झाल्यावर असा दर्जा मिळेल आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतून अधिकृत वाद्य म्हणून घुमट वाजविता येईल. वसईतील प्रसिद्ध घुमटवादक विल्यम डिमेलो म्हणतात की, हे वाद्य कोणत्याही प्रकारचे ध्वनिप्रदूषण करीत नाही. पोर्तुगीज काळापासून हा संगीत वारसा येथे जपला जात असून ख्रिश्चनांबरोबरच गणेशोत्सव, होळी, दहीकाला अशा उत्सवप्रसंगी हिंदू बांधवसुद्धा घुमट वापरतात. एका घुमटाची किंमत ७००-८०० रुपयांपर्यंत असते. त्यासाठी लागणारी मडकी कुंभाराकडून खास बनवून घेतली जातात. वसईत युवक-युवतीचा “घुमटगँग' नावाचा वाद्यमेळ असून घुमटाच्या ठेक्यावर ते पारंपरिक लोकगीतांचे संगीत जलसे जल्लोषात साजरे करतात.

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...