5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत क्रिकेट विश्वचषकाची 13 वी आवृत्ती भारतात आयोजित केली जात आहे. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे चालवली जाणारी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. सर्व कसोटी खेळणार्या देशांव्यतिरिक्त, पात्र देश यात सहभागी होत आहेत.यावेळी 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत.स्पर्धेत सर्व 10 संघांमध्ये राऊंड-रॉबिन लीग स्वरूपावर आधारित 45 सामने होतील. यापैकी सर्वोत्कृष्ट ४ संघ उपांत्य फेरीत खेळतील. तीन बाद फेरी, दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना खेळवला जाईल. वर्ल्ड कपच्या आतापर्यंत बारा आवृत्त्या झाल्या आहेत. या काळातले अनेक रंजक किस्से आहेत…
विश्वचषक स्पर्धेचा प्रवास- पहिली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 1975 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर, दर चार वर्षांनी (1992 मध्ये प्रत्येक पाच वर्षांनी आणि 1999 मध्ये तीन वर्षांनी वगळता) त्याचे आयोजन केले जाते. इंग्लंडने 1975, 1979, 1983, 1999 आणि 2019 मध्ये सर्वाधिक पाच वेळा भारत आणि पाकिस्तान 1987, 1996 आणि 2011 मध्ये तीन वेळा, 1996 मध्ये श्रीलंकेसह. 1992 आणि 2015 मध्ये दोनदा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड. दक्षिण आफ्रिका 2003 आणि वेस्ट इंडीज 2007 ने प्रत्येकी एकदा यजमानपद भूषवले आहे.
ऑस्ट्रेलियाकडे सर्वाधिक पाच जेतेपदे आहेत.भारताने 1983 मध्ये 60 षटकांचे आणि 2011 मध्ये 50 षटकांचे - दोन वेगवेगळ्या विश्व षटकांचे विजेतेपद पटकावले आहे. विश्वचषकात सचिनच्या नावावर सर्वाधिक २२७८ धावा आहेत, तर २३७ धावांची वैयक्तिक धावसंख्या न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर आहे. ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअलच्या नावावर 372 धावांची सर्वात मोठी भागीदारी झिम्बाब्वेविरुद्ध आहे. सर्वाधिक 71 विकेट्स घेण्याचा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे. भारतीय गोलंदाज चेतन शर्माच्या नावावर विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक घेण्याचा विक्रम आहे, जी त्याने 1987 मध्ये साधली होती.
1987 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक इंग्लंडच्या बाहेर आयोजित करण्यात आला होता, ज्याचे आयोजन भारत आणि पाकिस्तानने केले होते. या विश्वचषकात प्रथमच एका सामन्यातील षटकांची कमाल मर्यादा ६० वरून ५० करण्यात आली. 1992 मध्ये पहिल्यांदा विश्वचषकात रंगीबेरंगी कपडे, पांढरा चेंडू आणि दिवस-रात्र सामने आयोजित करण्यात आले होते. 1975 आणि 1979 मध्ये वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉईड आणि 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वाखाली दोनदा विश्वविजेते बनण्याचा विक्रम आहे.
आजपर्यंतचे विश्वविजेता संघ- आतापर्यंत बारा विश्वचषकांचे आयोजन करण्यात आले आहे, जे पाच देशांनी जिंकले आहेत - ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 अशी पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. वेस्ट इंडीज 1975 आणि 1979 आणि भारत 1983 आणि 2011 प्रत्येकी दोनदा हा चषक आपल्या नावावर केला आहे. आणि पाकिस्तान 1992, श्रीलंका 1996 आणि इंग्लंड 2019 प्रत्येकी एकदा हा चषक जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. क्रिकेटविश्वावर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारे दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश अजूनही या विश्वविजेतेपदापासून वंचित आहेत.
विश्वचषकातील सर्वात संथ खेळी- विश्वचषकातील सर्वात संथ खेळी खेळण्याचा अनोखा विक्रम आजही सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. भारताचा सामना 7 जून 1975 रोजी इंग्लंडशी झाला होता.इंग्लंडने 60 षटकांत 4 गडी गमावून 334 धावा केल्या. गावस्कर झटपट धावा करतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण गावस्कर सलामीला आल्यानंतर ६० षटकांत १७४ चेंडू खेळून एका चौकारासह ३६ धावाच करू शकले. अखेर ते नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतले.गावस्करची ही खेळी आजही विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात संथ खेळी म्हणून ओळखली जाते. याच गावसकर यांनी 1987 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नागपुरात 85 चेंडूत शतक झळकावले होते, जे त्यावेळचे दुसरे जलद शतक होते.
झेलची कमाल, जिंकले आणि पराभूतही झाले- 25 जून 1983 चा काळ होता. इंग्लंडमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसऱ्या विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात होता. भारतीय संघ केवळ 183 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेस्ट इंडिजची दमदार फलंदाजी पाहता भारताचा पराभव निश्चित वाटत होता. वेगवान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्सने सलग सात चौकार मारून वेस्ट इंडिजच्या तिसऱ्यांदा विजयाचा मार्ग खुला केला. पण रिचर्ड्सने मदनलालचा एक चेंडू जोरात मारला तेव्हा भारतीय कर्णधार कपिल देवने विरुद्ध दिशेला धावत जात एक अशक्य वाटणारा झेल घेत रिचर्ड्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. भारताच्या विश्वविजेतेपदासाठी हा झेल महत्त्वाचा ठरला. कारण त्यानंतर संपूर्ण वेस्ट इंडिज संघ 143 धावांवर बाद झाला. कपिलच्या या झेलमुळे भारत पहिल्यांदाच विश्वविजेता बनला.
आत्मसन्मान दुखावल्याने विश्वविजेता बनला- १९९६ ची विश्वचषक स्पर्धा भारत-पाकिस्तान-श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून श्रीलंकेतील परिस्थिती सामान्य नव्हती. या कारणास्तव, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या संघांनी श्रीलंकेत नियोजित केलेले त्यांचे साखळी सामने खेळण्यास नकार दिला. यामुळे श्रीलंकन क्रिकेटपटू आणि तिथल्या क्रीडाप्रेमींच्या स्वाभिमानाला खूप मोठा धक्का बसला. आत्मसन्मान दुखावल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेच्या संघाने विश्वचषक जिंकून उत्तर देण्याचे ठरवले.या हेतूने त्यांनी आपली खेळण्याची शैलीच बदलली. तळातील फलंदाज असलेल्या सनथ जयसूर्या आणि यष्टीरक्षक कलुवितरण यांचा सलामीवीरात समावेश करण्यात आला आणि त्यांना आक्रमक फलंदाजी करण्याचे आदेश देण्यात आले.याच रणनीतीच्या जोरावर खेळत श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. जेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना त्याच ऑस्ट्रेलियन संघाशी झाला ज्याने श्रीलंकेत जाऊन न खेळल्याने लंकेच्या खेळाडूंचा स्वाभिमान दुखावला होता. श्रीलंकेच्या खेळाडूंनी विजेतेपदाच्या लढाईत पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा 7 विकेट्स राखून पराभव करत विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment