नीडल फिशचे दात सुईसारखे असतात, म्हणून त्याला नीडल फिश म्हणतात.त्याला ‘भाला मासा’ असेही म्हटले जाते. सुई माशांच्या हाडांचा रंग हिरवा असतो. म्हणून काही लोक याला ‘हिरव्या हाडांचा मासा’ असेही म्हणतात. गोड्या पाण्यात आढळणाऱ्या नीडल फिशची एक प्रजाती अॅमेझॉन नदीत आढळते. या माशांना भारतातील नद्यांमध्ये देखील पाहिले जाऊ शकते. या माशांच्या सुमारे 60 प्रजाती आहेत. हे मासे जगातील बहुतेक उष्णकटिबंधीय-समशीतोष्ण समुद्र आणि महासागरांमध्ये आढळतात. परंतु उष्णकटिबंधीय समुद्रांमध्ये त्याची संख्या अधिक आहे. युरोपियन नीडल फिश भूमध्य समुद्र आणि काळ्या समुद्रात आढळतात. यांना बाल्टिक समुद्रापर्यंत उत्तरेकडे पाहिले जाऊ शकते. भारताच्या समुद्रात नीडल फिशच्या दोन प्रजाती आढळतात. यांची शारीरिक रचना इतर माशांपेक्षा वेगळी असते. याचे शरीर काहीसे चपटे, सडपातळ आणि लांब असते.नीडल फिशची लांबी साधारणपणे 75 सेमी ते 1 मीटर पर्यंत असते. नीडल फिशच्या काही प्रजाती उष्णकटिबंधीय समुद्रांमध्ये आढळतात, ज्यांची लांबी 1.5 मीटर पर्यंत असते. याच्या पाठीचा रंग हिरवट निळा आणि पोटाचा रंग चांदीसारखा असतो.
नीडल फिशचे डोळे पिवळे असतात आणि त्यांच्याभोवती लाल वर्तुळ असते. या माशाचे जबडे डोक्यापेक्षा लांब आणि चोचीसारखे समोरून टोकदार असतात. त्यामुळे त्याचे नाक भाल्यासारखे दिसते. त्यामुळे त्याला ‘भाला मासा’ असेही म्हणतात. नीडल फिश हा एक कार्यक्षम आणि पट्टीचा पोहणारा मासा आहे. हा पाण्यातून बाहेरच्या दिशेने उडी मारतो आणि काही अंतरापर्यंत पाण्याच्या पृष्ठभागावर घसरत जातो. हे मासे नेहमी गटा-गटाने राहतात. हा मासा अनेक सागरी माशांची शिकार करतो, पण टूना मासा याची शिकार करतो. नीडल फिश पाण्याच्या पृष्ठभागावरून 2 मीटरपर्यंत उंच उडी मारू शकतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment