ओडिशा राज्यातील चिल्का हे खाऱ्या पाण्याचे मोठे सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते. यामध्ये महानदीतील भार्गवी, दया, कुसुमी, सालिया, कुशभद्रा असे प्रवाह येऊन मिळतात. जैवविविधतेचे उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळते. येथील अनुकूल हवामान पक्ष्यांना आकर्षित करते. सुमारे १५८ प्रजातींचे पक्षी येथे पाहायला मिळतात. त्यांच्यामधील 95 स्थलांतरित पक्षी आहेत, जे हजारो मैल दूर सायबेरिया, बैकल, मंचुरिया इत्यादी ठिकाणांहून येतात आणि येथे मुक्काम ठोकतात. बदके, लिटल स्टिंकर्स, सँडरलिंग, क्रेन, गोल्डन प्लोवर, फ्लेमिंगो, स्टॉर्क गल्स, सॅड पायपर्स आणि ग्रे पेलिकन हे येथे आढळणारे प्रमुख पक्षी आहेत. इथे पक्ष्यांचे वेगवेगळ्या थवे ठीक- ठिकाणी अशा प्रकारे दिसतात की, जणू काही त्यांच्या स्वतंत्र वसाहतीच वसवल्या आहेत. म्हणूनच या ठिकाणाला पक्षी निरीक्षकांचे नंदनवन म्हणतात. आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवरानंतरचे हे दुसरे सरोवर आहे, जिथे पक्ष्यांचा एवढा मोठा मेळा पाहायला मिळतो.
ओडिशाच्या किनारी भागात पसरलेले हे सरोवर आपल्या सौंदर्य आणि जैवविविधतेसाठी जगप्रसिद्ध आहे. बंगालच्या उपसागराला लागून असलेले चिल्का हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. वाळूच्या ढिगाऱ्यांनी बनलेली एक लांब भिंत तिला समुद्रापासून वेगळे करते.
पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या सरोवराला 1973 मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. मासे, कोळंबी आणि खेकडे इत्यादींच्या 150 हून अधिक प्रजाती इथल्या पाण्यात आढळतात. येथून दरवर्षी सुमारे 6 हजार टन सी फूड मिळते. हे सरोवर किनारीपट्टीवरील ओडिशातील रहिवाशांच्या संस्कृतीचा एक विशेष भाग बनले आहे. सरोवराच्या काठावर दरवर्षी तारतारिणी यात्रा भरते. पर्यटन विभागातर्फे दरवर्षी सरोवरात बोटींच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात. नाशपाती फळाच्या आकारात आणि 1100 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा सरोवर सुमारे 70 किलोमीटर लांब आणि 15 किलोमीटर रुंद आहे. त्याची सरासरी खोली तीन मीटर आहे. सरोवराच्या एका बाजूला निळाशार समुद्र तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्ग आहेत आणि त्याही पलीकडे हिरवेगार डोंगर आहेत. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment