अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असणाऱ्या पळशी या छोट्याशा गावातील गढीवजा भुईकोट किल्ला, होळकरांचे दिवाण राहिलेल्या पळशीकरांचा सुंदर लाकडी वाडा, ‘राही-रखुमाई’ नावाचे विठ्ठलाचे देखणे मंदिर पर्यटकांना आकर्षित करतात. या गावात इतिहासाचा संपन्न वारसा वास्तूंमधून पाहावयास मिळतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पळशी गाव एका भुईकोट किल्ल्यात वसले आहे. त्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव-कांबळे पळशीकर यांचे. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळालं. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, वाडा आणि मंदिराची उभारणी केली. या भुईकोटामध्ये येण्यासाठी दोन दिशांना दोन भक्कम प्रवेशद्वारे आहेत. यातला मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला असून त्या दरवाजाला भक्कम असे दोन बुरूजदेखील दिसतात. याच प्रवेशद्वारावर दोन शिलालेख आहेत.
शके १७०९ मध्ये पळशी या गावात या गढीच्या/किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली त्या वेळची मराठी तिथी या शिलालेखात दिलेली दिसते. तसेच १७१९ साली काम पूर्ण झाल्याचीही माहिती मिळते. किल्ल्याचे बांधकाम रामराव अप्पाजी कांबळे – कुलकर्णी या जहागीरदारांनी केल्याचे समजून येते. आतमध्ये बरीच घरे आहेत. मंदिरे, बाजारपेठ दुकानेही दिसतात. पण यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेते ते महादेवाचे मंदिर. मंदिराचं हे वास्तुस्थापत्य मात्र आवर्जून पाहण्यासारखंच. संपूर्ण दगडात बांधलेल्या या मंदिराचा सभामंडप म्हणजे एक आश्चर्यच आहे. गोलाकार छत असलेल्या या मंडपात एकही खांब नाही. गाभाऱ्यात सुरेख शिविपडी आहे. मंदिराच्या भिंतीतील खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. हे मंदिर बहुधा पेशवाईच्याच काळात बांधले गेले असावे.
महादेव मंदिराच्या जवळच पळशीकरांचा देखणा वाडा आहे. लाकडात बांधला गेलेला हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अद्भुत आणि उत्कृष्ट आविष्कारच आहे. हा वाडा तीन मजली आहे. वाडय़ाचे प्रवेशद्वार देखणे आहे. त्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवडय़ाही दिसतात. या देवडय़ा पार करून डाव्या बाजूने आत गेलो की वाडय़ाचा मुख्य चौक लागतो. इथे नाजूक नक्षीकाम पाहायला मिळतं. अननसाच्या पानासारखी खांबावर असणारी नक्षी, अंबारीसह हत्ती देवदेवतांच्या मूर्ती, यामधली फुलांची परडी असे विविध नक्षीकाम आहे. वाडय़ाच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिनेही आहेत. वाडय़ाच्या खालच्या मजल्यावरचे देवघरही पाहण्यासारखे आहे. जुन्या पद्धतीचे देवघर, त्याची मांडणी, छत आणि लाकडी सजावट दिसते. वाडय़ाचे मालक पळशीकर सध्या इंदूरला वास्तव्यास असल्याचे सांगतात.
वाडा पाहून झाले की राही रखुमाई मंदिर पाहता येते. हे मंदिर मात्र भुईकोटाच्या बाहेर म्हणजेच दक्षिण दरवाजाच्या जवळच आहे. छोटय़ाशा ओढय़ाजवळील एका बंधाऱ्याजवळ हे मंदिर बांधलंय. त्यामुळे येथे बारमाही पाणी असते. मंदिराला सुरेख असे प्रवेशद्वार आणि त्यावर नगारखानाही दिसतो. तसेच मंदिराला चहुबाजूंनी तटबंदीसदृश बांधकामही दिसते. मंदिराची रचना सभामंडप आणि गाभारा अशी आहे. संपूर्ण दगडात घडवलेल्या या मंदिरांच्या भिंतीवर अनेक आकर्षक शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच अनेक देवदेवतांच्या मूर्तीही येथे चितारल्या आहेत. सभामंडप हा १८ दगडी आणि नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला दिसतो. हे खांब गोलाकार आणि सुंदर असून यावरचे नक्षीकामही पाहण्यासारखे आहे. गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली दिसते. ही मूर्ती कृष्णरूपातील विठ्ठलाची आहे असे अभ्यासकांचे मत आहे. कारण या मूर्तीच्या तळपट्टीवर गायीची शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच विठुरायाच्या दोन्ही बाजूंना राही आणि रखुमाईच्या संगमरवरी मूर्ती बसवलेल्या दिसतात. पण या दोन्हीही मूर्ती विठ्ठलाच्या मूर्ती स्थापनेनंतरच्या कालावधीतील असाव्यात. मंदिराच्या बाहेर छोटीशी पुष्कर्णीही दिसते. या पुष्करणीत उतरण्यासाठी पायऱ्याही केलेल्या दिसतात. मंदिराच्या शेजारील बंधाऱ्याच्या पलीकडे राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आणि मंदिरे आहेत.
पारनेरपासून पळशीपर्यंत जायला चांगला डांबरी रास्ता आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा -बेल्हे- टाकळी ढोकेश्वर – खडकवाडी मार्गे किंवा पुणे नगर महामार्गावरून शिरुर- राळेगणसिद्धी -टाकळी ढोकेश्वर या मार्गेही पळशी गाव गाठता येते.

No comments:
Post a Comment