परीकथा कोणाला आवडत नाहीत. विशेषत: आपल्या लोककथांमध्ये परी आपल्याला अनेक रूपात दिसते. लोककथा जपल्या नाहीत तर त्या कालांतराने नष्ट होतात. त्यामुळे लोककथांचे संकलन करून पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे हे मोठे काम आहे. ग्रिम बंधूदेखील अशाच कामात आयुष्यभर मग्न राहिले. ग्रिम ब्रदर्स म्हणून ओळखल्या जाणार्या भावांच्या जोडीत मोठा भाऊ जेकोबचा जन्म 4 जानेवारी 1785 रोजी झाला. तर धाकटा भाऊ विल्हेल्म ग्रिम यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1786 रोजी झाला. दोघांचा जन्म जर्मनीतील होनाव शहरात झाला. नऊ भावंडांमध्ये ते दुसरे आणि तिसऱ्या स्थानी होते. त्यांच्या वडिलांनी त्यांची खूप काळजी घेतली. मात्र वडिलांचे अकाली निधन झाले.
वडील वारले तेव्हा दोन्ही भाऊ दहा वर्षांचेही नव्हते. अशा स्थितीत त्यांनी गरिबीचे वाईट दिवसही पाहिले. कसेबसे कष्ट करून दोन्ही भावांनी कॉलेज गाठले. तेथे त्यांचे प्राध्यापक ज्युरीस्ट फ्रेडरिक यांनी त्यांना जर्मन साहित्य आणि तत्त्वज्ञानाकडे ओढले. या टप्प्यात त्यांचा कल जर्मन लोकसाहित्याकडे वाढला. सुरुवातीला दोन्ही भावांनीही नोकरी केली. जाकोब घर चालवत असे. तो मोठ्या कष्टाने घर चालवत असे. अशा परिस्थितीत 1808 मध्ये जेकबला कॅसलमध्ये ग्रंथपाल म्हणून नोकरी मिळाली. त्याने आपल्या भावांना शिकवलं. पुढे विल्हेल्म हा त्याच्या मोठ्या भावासारखाच ग्रंथपाल झाला. तेव्हाच त्यांच्या मनात लोककथा गोळा करण्याचा विचार आला.
लोकसाहित्य जाणून घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण जर्मनीचा प्रवास केला. लोकांना भेटले, त्यांच्याकडून लोककथा ऐकल्या आणि त्या लिहून काढल्या. त्यांना पुस्तकाचं रूप दिलं. मग काय! एकच खळबळ उडाली. 1812 मध्ये जर्मन भाषेत 'चिल्ड्रन अँड हाउसहोल्ड टेल्स' हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. तेव्हापासून 1857 पर्यंत सुमारे 40-45 वर्षांत त्यांच्या कथासंग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक आवृत्तीत कथा वाढत गेल्या आणि पहिल्या आवृत्तीतील 86 कथांची संख्या पुढे 200 पेक्षा जास्त झाली.
कालांतराने त्यांनी गॉटिंगेन विद्यापीठात नोकरी स्वीकारली. जेकोब तेथे शिकवू लागला आणि विल्हेल्म ग्रंथपाल झाला. जर्मन भाषेला त्यांनी प्रथमच तिथे विषय म्हणून लागू केला. पण त्यावेळी जर्मनीची स्थिती चांगली नव्हती. प्रजा आणि राजा यांच्यात मतभेद चालू होते. यामध्ये जेकोब राजाविरुद्ध उभा होता. यावर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले तर गॉटिंगेनमधून हद्दपार करण्यात आले. ते दोघे पुन्हा कॅसलमध्ये परत आले.
आता त्यांनी जर्मन शब्दकोश तयार करण्याचे काम हाती घेतले. या दरम्यान, त्यांच्या मित्रांच्या प्रयत्नाने त्यांना बर्लिन विद्यापीठात नोकरी तर मिळालीच, शिवाय पुन्हा संशोधन करण्याची संधीही मिळाली. 1848 मध्ये जर्मन क्रांतीनंतर सत्तेत उलथापालथ झाली, दोन्ही भाऊ तिथल्या संसदेत निवडून गेले. यानंतर त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली आणि दोन्ही भावांनी मिळून पुन्हा जर्मन शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र त्यांच्या हयातीत ते पूर्ण झाले नाही. 1859 मध्ये विल्हेमचा मृत्यू झाला. चार वर्षांनंतर १८६३ मध्ये जेकोबने हे जग सोडले. पण त्यांनी संकलित केलेल्या कथा 'सिंड्रेला' असोत, 'स्नो व्हाइट अँड सेव्हन ड्वार्फ्स' असोत किंवा 'फ्रॉग प्रिन्स' असोत, या कथांनी प्रत्येक पिढीतल्या मुलांना वेड लावलं.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment