प्रश्न 1 जगातील किती टक्के लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या 'जागतिक जल विकास अहवाल २०२३' मध्ये म्हटले आहे?
उत्तर- जगातील २६ टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही, तर ४६ टक्के जनता शौचालयाच्या सुविधेपासून वंचित आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. पाणी या विषयावर संयुक्त राष्ट्रांमध्ये ४५ वर्षांमध्ये प्रथमच एका मोठ्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. जगातील सर्व लोकांना २०३० पर्यंत स्वच्छ पाणी आणि मलनिस्सारणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संयुक्त राष्ट्रांनी काही उद्दोष्ट्ये निश्चित केली आहे, मात्र ती उद्दिष्टे आणि प्रत्यक्षातील स्थिती यांच्यातील प्रत्यक्ष अंतर असून प्रचंड काम करणे आवश्यक असल्याचे 'जागतिक जल विकास अहवाल २०२३'मध्ये म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वर्षाला ६०० ते १००० अब्ज डॉलर इतक्या निधीची आवश्यकता असल्याचा अंदाज या अहवालाचे संपादक रिचर्ड कॉनर यांनी व्यक्त केला. ते मगणाले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निधी उभारण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी गुंतवणूकदार, वित्त संस्था, विविध देशांमधील सरकारे, पर्यावरणवादी संघटना यांच्याशी भागीदारी करून पैशांचा ओघ या कामाकडे वळविणे आवश्यक आहे."
प्रश्न 2 कोणत्या भारतीय वंशाच्या अभिनेत्रीला अमेरिका सरकारतर्फे 'राष्ट्रीय मानवता पदक' देऊन सन्मान करण्यात आला?
उत्तर- अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रतिष्ठेचे राष्ट्रीय मानवता पदक भारतीय वंशाच्या अभिनेत्री, पटकथालेखिका आणि दिग्दर्शिका मिंडी कलिग यांना प्रदान केले. त्यांच्याबरोबरच आणखी काही जणांचाही असे पदक देऊन गौरव करण्यात आला. नव्या पिढीच्या कथाकथनकारांना बळ देण्याच्या मिंडी यांच्या कामाची दखल घेत त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले असल्याचे 'व्हाइट हाउस'तर्फे सांगण्यात आले. कलाकार आणि कलेचे आश्रयदाते यांना अमेरिका सरकारतर्फे दिला जाणारा हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. आपल्या कलेत पारंगत होण्याबरोबरच इतरांसाठीही एक आदर्श निर्माण करणाऱ्या कलाकाराला तो दिला जातो. हा पुरस्कार मिळविणाऱ्या मिंडी या पहिल्या बिगर गौरवर्णिय कलाकार आहेत. आपली कथा अत्यंत प्रभावीपणे सांगण्यासाठी मिंडी यांनी नव्या पिढीला प्रेरणा दिली, असे गौरवोद्गार ज्यो बायडेन यांनी या वेळी काढले.
प्रश्न 3 शाहरुख खान आणि सलमान खान 'पठाण' चित्रपटानंतर कोणत्या चित्रपटातून पुन्हा एकत्र येत आहेत?
उत्तर- सलमान खान आणि शाहरुख खान हे दोन महारथी ‘टायगर 3'' मधून एकत्र येत आहेत. पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडून थक्क करायला लावणारे साहसी मनोरंजन करणार आहेत. 'टायगर 3’ हा वायआरएफ हेर विश्वातील कल्पनेवर आधारलेला सिनेमा असून 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यानंतरचा तिसरा सिनेमा आहे. 'टायगर ३'मधील सलमान -एसआरके दृश्याकरिता निर्माते भव्य सेटची निर्मिती करत आहेत आणि त्याकरिता ४५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. सलमान खान आणि शाहरूख खान पुन्हा एकदा 'टायगर 3'करिता पडद्यावर दिसणार आहेत आणि सिनेमाच्या दृष्टीने हा एक भव्य आश्चर्यकारक पैलू असणार आहे. 'टायगर ३' मध्ये कतरिना कैफ झोयाच्या; तर इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शनासाठी तयार असणार आहे.

No comments:
Post a Comment