Sunday, May 14, 2023

ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेला सातारा


(ओळख जिल्ह्याची)

सातार्‍याची ओळख म्हणजे पेन्शनरांचे शहर. चित्रकार, कलाकार, लेखक, साहित्यिक, विचारवंत तसेच चळवळीचे नेतृत्व करणारे याच मातीत जन्माला आले.   साताऱ्याला ऐतिहासिक आणि  सामाजिक पार्श्वभूमी आहे. चळवळी आणि लढवय्यांचा जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. या मातीतील अनेकांनी जशी छत्रपती शिवरायांची पाठराखण केली, तशीच ती देशाच्या रक्षणासाठी पिढ्यान्पिढ्या घालवणारी या जिल्ह्यातील काही गावेदेखील आहेत. देव, देश अन्‌ धर्मासाठी सर्वस्व बलिदान करण्याची तयारीही या जिल्ह्यातील लोकांची असते. परंपरा सांभाळणे आणि ती जपणे यालाही प्राधान्य दिले जाते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई या फलटणच्या माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या होत्या. फलटणचे निंबाळकर घराणे तेव्हापासून आपला वारसा जपत आले आहे, तर शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे तळबीडचे होते. ते सैन्यात जुमला म्हणजे शे-दीडशे सैन्यांचे अधिकारी होते, तसेच ते ताराराणी यांचे वडील होते. असा ऐतिहासिक वारसा सातारा जिल्ह्याला लाभला आहे. अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, वृषालीराजे भोसले यांच्या माध्यमातून पुढे सरकत आहे. साताऱ्याचा राजवाडा, अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगड हे कायम शिवरायांच्या पराक्रमाची आणि अस्तित्वाची साक्ष देत असतात.  

सातार्‍याला असाच क्रांतीचादेखील इतिहास आहे. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावून लढणारे क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांनी साताऱ्यातून प्रतिसरकार (पत्रीसरकार) चालविले, त्यांचाही वारसा साताऱ्याला आहे. त्यांचा जन्म आताच्या सांगली जिल्ह्यातील असला तरी त्यांचे बहुतेक काम हे सातारा जिल्ह्यातच होते. शासनाची समांतर व्यवस्था असलेले प्रतिसरकार त्यांनी चालविले होते.  जिल्ह्यातील अनेक क्रांतिकारकांनी त्यावेळी या लढ्यात उडी घेतली होती. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, किसन वीर अशा कितीतरी नावांचा अभिमान साताऱ्याला आहे.

कामगारांसाठी लढणारे आणि त्यांचे खटले मोफत चालविणारे अँड. व्ही.एन. पाटील, डी.व्ही. पाटील यांच्यासारखे कामगारांचे नेतेही साताऱ्याच्या मातीत जन्माला आले. बा.सी. मर्ढेकर, गो.पु. देशपांडे, व.बा. बोधे, आ.ह. साळुंखे यांच्या साहित्यकृतींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न सातारकरांमधून होतो. खाद्यसंस्कृतीमध्येही सातारकरांचा गोडवा जरा वरचाच आहे. येथील कंदी पेढ्याची तुलना जगातील कोणत्याच पेढ्याशी होत नाही.  या पेढ्याबरोबरच लावण्यांमधूनही साताऱ्याच्या चुन्याची खासियत सांगितली जाते. याठिकाणच्या चुना गल्ल्याही प्रसिद्ध आहेत. 

साताऱ्याच्या सभोवती असलेल्या सात किल्ल्यांचाही सातारकरांना अभिमान आहे. अजिंक्यतारा, सज्जनगड, प्रतापगड, मकरंदगड, महिमंडणगड, वासोटा या किल्ल्यांवरील सैर एक वेगळी अनुभूती आणि इतिहासाची पदोपदी आठवण करून देणारी असते. कासचे जगप्रसिद्ध पठार आणि महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी सर्वांना मोहात पाडतेच. 

 सातारा जिल्ह्याला महापुरुषांच्या पदस्पर्श झाला आहे. या मातीतून अनेक नररत्न मोठी झाली आहेत. त्यांच्या खानाखुना आजही जिवत आहेत.  रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मृतिस्थळ, ज्या महामानव लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टर झाले. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी राज्यघटना लिहिली असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचा श्रीगणेश सातार्‍यातील प्रतापसिंह महाराज विद्यालयातून केला. ती शाळा आजही ज्ञानदान करत आहे. गोरगरिबांच्या मुलांनी शिकावे म्हणून त्यांना उचलून शाहू बोडिगमध्ये ठेवले, ती धननी बाग, तेथील वडाचे झाड आजही उभे आहे. एवढेच नाही तर मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणार्‍या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, क्रातिवीर ज्योतिबा फुले याच खटाव तालुक्यातील कटगुणचे, समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरिती संपविण्यासाठी आयुष्य वेचेलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष  डॉ. नरेंद्र दाभोलकर याच मातीत घडले आहेत. या सर्वांचे कार्य संपूर्ण राज्याला दिशा देणारे ठरले आहे. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...