जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांचे या वर्षापासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. पुण्याजवळच्या छोट्या गावात जन्म झालेला एक मुलगा लहानपणी आई वडिलांचं छत्र हरवल्यावर पुण्यात अनाथ विद्यार्थी गृहात येतो काय, तिथे आलेल्या राजस्थानी जादूगाराचे प्रयोग बघून प्रेरित होतो काय अन् स्वतःची टीम बनवून जगभर प्रयोग करतो काय...सगळंच जादुई आणि अद्भुत...प्रचंड मेहनत, कौशल्य, प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि सभशन कला, नावीन्याची आस आणि प्रबळ आत्मविश्वास या जोरावर जादूगार रघुवीर यांनी जगभर नाव कमावलं. म्हणूनच पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रात छत्रे यांनी सर्कशीत जे नाव कमावलं तेच काम जादूगार रघुवीर यांनी जादूच्या क्षेत्रात कमावलं आहे, असं कौतुक केलं आहे. रघुवीर जादूगार यांनी त्यांच्या हयातीमध्ये सात हजार २३ प्रयोग केले. वर्ष १९६० मध्ये पुण्यामध्ये ‘जादूची शाळा’ नावाची एक संस्था त्यांनी काढली. अनेक लहान गावांत व शहरांत त्यांनी शाळा, सामाजिक संस्था यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चॅरिटी शो केले. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये राधेश्याम महाराज साकारताना त्यामध्ये अचूकता यावी म्हणून अत्र्यांनी पणशीकरांना रघुवीर जादूगार यांच्याकडे जादूचे छोटे प्रयोग शिकायला पाठवले होते. रघुवीर जादूगार यांनी लिहिलेल्या ‘मी पाहिलेला रशिया’, ‘प्रवासी जादूगार’ या पुस्तकात त्यांच्या परदेशातील आलेल्या रोचक अनुभवाचे वर्णन वाचायला मिळते. यातील ‘प्रवासी जादूगार’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
रघुवीर यांनी आपल्या मुलाला आणि नातू जितेंद्र यांना विजय रघुवीर आणि मला हेच शिकवलं की केवळ वारसा हक्काने कला येऊन उपयोग नाही ती लोकांपुढे योग्य पद्धतीने सादर केली पाहिजे. त्यांची एक हृदय आठवण जितेंद्र जादूगार सांगतात की, माझ्या जन्माआधी माझ्या आईला खुशालीच्या लिहिलेल्या पत्रात जितेंद्र पुढे जाऊन उत्तम जादूगार बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांचा हाच विश्वास जितेंद्र जादूगार यांनी सार्थ ठरवला आहे. तिसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत आहे. जितेंद्र यांनी अनेक नवीन जादू कला शिकली आहे. जपानची तीन भुते, बॉक्स ऑफ मोगली, अव्हेंजर सिरीज मधील काही जादू, गिफ्ट बॉक्स हाऊस ऑफ मायाजाल आणि बालपणावर आधारित स्पेशल जादू असे अनेक प्रयोग सादर केले जातात. जादू ही कला महाराष्ट्राच्या मातीतून जगभरात नेणाऱ्या या अवलियाला जादुई मानवंदना.

No comments:
Post a Comment