तुम्ही अनेक स्विमिंग पूल पाहिले असतील. पण तुम्ही इमारतीच्या वर बांधलेल्या 360 डिग्रीवाल्या स्विमिंग पूलबद्दल ऐकले किंवा वाचले आहे का? नसेल माहीत तर आम्ही तुम्हाला जगातील पहिल्या आणि सर्वात उंच 360 डिग्री इन्फिनिटी स्विमिंग पूलबद्दल सांगतो.ऑरा स्कायपूल असे या अनोख्या स्विमिंग पूलचे नाव आहे. हे संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबई शहरात आहे. हा जलतरण तलाव स्थानिक पाम टॉवर येथील विश्रामगृहाचा भाग आहे. आरा स्कायपूल हा जगातील पहिला आणि सर्वात उंच 360 डिग्री इन्फिनिटी पूल असल्याचे मानले जाते. इमारतीच्या 50 व्या मजल्यावर असलेला हा जलतरण तलाव जमिनीपासून सुमारे 200 मीटर उंचीवर बांधला गेला आहे. त्यामुळे आरा स्कायपूलला 'आइसलँड आफ द स्काय' असेही म्हटले जाते. इमारतीच्या चारी बाजूंनी हा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे.
यामध्ये तुम्हाला 360 डिग्री स्विमिंगचा अनुभव मिळतो. स्विमिंग पूल अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे की तो हवेत लटकलेला दिसतो इमारतीच्या काठाच्या बाजूने हा जलतरण तलाव बांधण्यात आला आहे, तर मधल्या भागात पाहुण्यांना आराम करण्यासाठी आरामशीर जागा करण्यात आली आहे. हे ठिकाण व्हीआयपी झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागले गेले आहे.
आरा स्कायपूलला इन्फिनिटी पूल का म्हणतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तविक, जेव्हा एखादी व्यक्ती या जलतरण तलावाच्या आत असते तेव्हा त्याला असा भ्रम होतो की या तलावाला अंत नाही. खरं तर, जलतरण तलाव त्याच्या काठापर्यंत पाण्याने भरलेला आहे आणि जिथे इमारत आहे तिथून सर्व बाजूंनी समुद्राचे अथांग पाणी दिसते. स्विमिंग पूलचे पाणी समोरच्या समुद्राच्या पाण्यात मिसळल्यासारखे वाटावे अशा पद्धतीने पूलची रचना करण्यात आली आहे. आरा स्कायपूलवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:
Post a Comment