अझरबैजान, एकेकाळी पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचा भाग होता, हे मुस्लिम बहुल प्रजासत्ताक आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.बाकू हे कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले एक अविस्मरणीय शहर आहे. रहस्यमय वाटणारे बाकू शहर सोव्हिएत काळातील भव्य इमारती, 21व्या शतकातील वास्तुकला आणि शतकानुशतके जुने बुटीक, कॉफी शॉप्स आणि आकर्षक रेस्टॉरंटने भरलेले आहे. एकेकाळी जगातील निम्मे पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन बाकूमध्ये होत असे. रातोरात करोडपती बनलेल्या लोकांनी मग आलिशान वाडे, निवासस्थाने आणि सार्वजनिक इमारती निर्माण केल्या. यापैकी बरेच बाकूच्या प्रसिद्ध इस्तिग्लियट रस्त्यावर स्थित आहेत, जे तटबंदीच्या उत्तरेकडील शहराच्या भिंतीला समांतर आहे. UNESCO-सूचीबद्ध शहराचा जुना भाग, ज्याला 'इचेरी सिटी' म्हणूनही ओळखले जाते, याठिकाणी अतिशय भिन्न स्वरूपात बाकू दिसते. हा जिवंत परिसर म्हणजे प्राचीन मशिदी, आर्ट गॅलरी, मिनी-रेस्टॉरंट्स आणि अनेक बुटीक हॉटेल्सने नटलेले मध्ययुगीन गल्लींचे जादुई जाळे आहे. मैदान टॉवरच्या शेजारी जुन्या शहरातील कारवान्सराई आणि चटईची दुकाने आढळतात. 'फ्लेम टॉवर्स' म्हणून ओळखल्या जाणार्या 30 मजली गगनचुंबी इमारतींचे त्रिकूट सर्वात दृश्यमान आहे.
अझरबैजानला ‘लँड ऑफ फायर’ असे टोपणनाव आहे. बाकूपासून तासाभराच्या अंतरावर एक अग्नि मंदिर आहे ज्याला स्थानिक लोक 'आतेशगाह' म्हणतात. हे मंदिर अझरबैजानमधील भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे कारण शिलालेखांनी सिद्ध केले आहे की अतेशगाहचा उपयोग हिंदू, शीख आणि शक्यतो पारसी लोक पूजास्थान म्हणून करत होते. 'ग्रँड ट्रंक रोड' मार्गे कॅस्पियन समुद्राच्या प्रदेशाशी व्यापारात गुंतलेल्या उत्तर-पश्चिम भारतीय उपखंडातील लोकांसाठी आतेशगाह हे एक प्रमुख धार्मिक-तात्विक केंद्र होते. हे पंचकोनी संकुल, ज्यामध्ये भिक्षूंच्या क्षेत्राने वेढलेले एक अंगण आणि मध्यभागी एक चतुर्भुज-वेदी आहे, 17व्या आणि 18व्या शतकात बांधले गेले. मंदिराच्या दरवाजाच्या अनेक दगडी स्लॅबवर ‘श्री गणेशाय नमः’ आणि ‘ज्वाला जी’ हे देवनागरी आणि गुरुमुखीमध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहेत. नैसर्गिकरित्या जळणारी चिरंतन ज्योत 1969 मध्ये या भागातील पेट्रोलियम स्त्रोतांचे दीर्घकाळ शोषण केल्यानंतर विझली. मात्र, आता ती शहरातून गेलेल्या गॅस पाईपने जळत असते.
एक गोष्ट नमूद करणे प्रासंगीक आहे ती म्हणजे भारताला मध्य आशिया आणि कॅस्पियन प्रदेशातील लोकांशी भौगोलिक-सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संपर्काची दीर्घ परंपरा आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या जन्मानंतर तेढ निर्माण झाली आहे. जगप्रसिद्ध वास्तुविशारद झाहा हदीद यांची सर्वात प्रसिद्ध निर्मिती हेदर अलीयेव सेंटर, बाकू विमानतळावरून सहज पाहता येते. अझरबैजानचे माजी अध्यक्ष हैदर अलीयेव यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे, ज्यांचा मुलगा सध्याचा राष्ट्राध्यक्ष आहे. आतमध्ये मनोरंजक संग्रहालये, प्रदर्शनाची जागा आणि विलक्षण ध्वनीशास्त्र असलेला कॉन्सर्ट हॉल आहे. विद्यमान राष्ट्रपती आणि त्यांच्या दिवंगत वडिलांनी देशाच्या वर्तमान इतिहासाला जबरदस्त आकार दिला आहे यात शंका नाही.

No comments:
Post a Comment