Saturday, September 2, 2023

सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी राज्यातील पहिले फळांचे गाव


राज्यातील फलोत्पादनाला चालना देण्यासाठी ‘फळांचे गाव’ ही संकल्पना कृषी विभागाने स्वीकारली आहे. ३५८ गावांना या संकल्पनेत आणण्याचे प्रयत्न होत आहेत. विशेष म्हणजे १९ फळांचे उत्पादन घेणारे धुमाळवाडी गाव आता राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाने ‘फळांचे गाव’ ही संकल्पना मांडली आहे. फलोत्पादनात जिद्दीने वाटचाल करणाऱ्या गावाला ‘फळांचे गाव’ म्हणून प्रशस्तिपत्र बहाल केले जाते. या गावांना फलोत्पादनाशी निगडित सल्ला, योजनांचा प्रसार, विस्तारविषयक उपक्रमांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. अलीकडेच धुमाळवाडीला (ता. फलटण, जि. सातारा) फळांचे गाव घोषित करण्यात आले. आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गावाला भेट देत फळबागांची माहिती घेतली व प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव केला. ‘फळांचे गाव’ म्हणून प्रशस्तिपत्र धुमाळवाडीला बहाल झाल्यामुळे गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे. “या गावातील शेतकऱ्यांनी १९ प्रकारच्या फळबागा जोपासल्या आहेत. विशेष म्हणजे उत्पादनाबरोबरच प्रक्रिया, निर्यात, पर्यटनातही धुमाळवाडीने आघाडी घेतली आहे.

शेतकऱ्यांची ही धडपड राज्याच्या शेती क्षेत्रात धुमाळवाडीची वेगळी ओळख मिळवून देणारी ठरते आहे. या धडपडीला प्रोत्साहन मिळण्यासाठी धुमाळवाडीला ‘फळांचे गाव’ म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यामुळे गावातील तरुण शेतकऱ्यांना फळबाग लागवड व फळप्रक्रिया उद्योगात काम करण्याची प्रेरणा मिळेल.

याशिवाय राज्यातील प्रत्येक तालुक्यात फळांचे गाव साकारावे, असा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. त्यासाठी ‘एक जिल्हा एक उत्पादन’ कार्यक्रमाचा उपयोग केला जाणार आहे. शेतकरी व कृषी विभागाच्या विस्तार यंत्रणेचा समन्वय जुळून आल्यास भविष्यात राज्यात किमान ३५८ ठिकाणी ‘फळांचे गाव’ घोषित होऊ शकतात. त्यामुळे या गावांमधील कृषी पर्यटनालाही चालना मिळणार आहे. राज्यात फलोत्पादनाचे समूह तयार करण्याचे काम सध्या कृषी विभागाकडून चालू आहे. पहिल्या टप्प्यात नाशिकमध्ये द्राक्ष; तर सोलापूरला डाळिंब समूह (हॉर्टिकल्चर क्लस्टर) तयार केला जात आहे. या समूहांमध्ये निवड झालेल्या गावांमध्ये फलोत्पादनाच्या सर्व योजना लागू केल्या जाणार आहेत. समूहातील प्रत्येक गावात पथदर्शक फळबागा साकारल्या जाणार असून या बागा, तेथील तंत्र पाहून इतर गावांनी फळबागा उभाराव्यात, असा हेतू या संकल्पनेचा आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

 

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांचा खास मित्र: खोकड

खोकड हा एक लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे.हा मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी ये...